Maharashtra Politics : महायुतीच्या शिडात फडणवीसांचे वारे | पुढारी

Maharashtra Politics : महायुतीच्या शिडात फडणवीसांचे वारे

हरिष पाटणे, सातारा
एकेकाळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात भाजपच्या पुढाकाराने महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. सातारा जिल्ह्यात येत असलेल्या सातारा व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन महायुतीच्या शिडात जोरदार वारे भरले आहे. दोन्ही मतदारसंघांतील इच्छुक पैलवानांना ‘किस्ताक’ चढवून ‘वस्ताद’ आखाड्याकडे अंगुली निर्देश करत कुस्तीचा इशारा देऊन गेले आहेत. फडणवीसांच्या दौर्‍याने महायुतीतील पैलवानांना बळ मिळाले असून, तालुकावार जोर-बैठकांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकेकाळी 9 आमदार, 2 खासदार सातारा जिल्ह्याने दिले. सातारा जिल्ह्यातील झाडून सार्‍या संस्थांची सत्ता केंद्रे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिली. मात्र, राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पक्षांतराच्या ज्या मोहिमा हाती घेतल्या त्यात सातारा जिल्ह्यातही उलट फेर झाले. काँग्रेस पक्षातील आ. जयकुमार गोरे, रणजितसिंह ना. निंबाळकर, मदनदादा भोसले, डॉ. अतुलबाबा भोसले, धैर्यशील कदम, मनोजदादा घोरपडे यांनी भाजपचे कमळ हातात घेतले, तर पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रबळ नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी घड्याळाचे काटे तोडून भाजपचे कमळ स्वीकारले. दोन्ही काँग्रेसमधील बलाढ्य नेत्यांच्या प्रवेशाने बळकट झालेल्या सातारा जिल्ह्याच्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देत अनेक सत्तास्थाने ताब्यात घेतली. राज्यात नव्याने उलट फेर झाल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर महायुतीची ताकद सातारा जिल्ह्यात आणखी वाढली. पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. महेश शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्वत:च्या मतदारसंघातील व्होट बँक वाढवली. त्यातच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यावरअखंड राष्ट्रवादी दुभंगली गेली. त्याचा फायदा महायुतीला नव्या राजकीय जुळणीत होऊ लागला आहे. अजित पवार गटाचे आ. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांची ताकद महायुतीला मिळाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात महायुती धष्टपुष्ट वाटू लागली आहे. एकटे आ. पृथ्वीराज चव्हाण निवडक सोबत्यांना घेऊन काँग्रेसची खिंड लढवत आहेत. दुसर्‍या बाजूने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे व त्या-त्या तालुक्यांतील शरद पवारांना मानणारे स्थानिक पदाधिकारी निकराची लढाई करत आहेत.

लोकसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने कागदावर व प्रत्यक्ष फिल्डवरही मजबूत झालेली महायुती वेगवेगळ्या सभा, मेळाव्यांद्वारे कार्यकर्ते चार्ज करू लागली आहे. मुळातच केंद्रीय मंत्र्यांचे सातत्यपूर्ण दौरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या आ. जयकुमार गोरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात उभा केलेला भाजपचा झंझावात, आ. गोरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पायाला भिंगरी लावून सुरू ठेवलेला जनसंपर्क त्याला भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची मिळत असलेली साथ यामुळे बुथ मॅनेजमेंटबाबत भाजप कमालीची स्ट्राँग झाल्याचे दिसत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना बुस्ट मिळावे, म्हणून भाजपचे शीर्षस्थ नेते सातारा व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत स्थानिक नेत्यांना वेळ देत आहेत.

कराडात डॉ. अतुल भोसले यांनी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. कृष्णा समूहाचे कौतुक करताना डॉ. अतुल भोसले यांना त्यांनी बळ दिले. त्याचवेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना बैलगाडीत व संपूर्ण कार्यक्रमातही सोबत ठेवत फडणवीसांनी एकी सांधली. महायुतीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची जंत्री सादर करताना फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाही बुस्ट दिले. कराड ते फलटण या हेलिकॉप्टर प्रवासात आ. जयकुमार गोरे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांना सोबत घेतले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांभीर्यपूर्वक चर्चा केली. सातारा मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांना त्यांनी वेळ दिला.

माढा मतदारसंघाचा भाग असलेल्या फलटण येथे विद्यमान खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांची भूमिपूजने करताना फडणवीसांनी निंबाळकरांचे तोंडभरून कौतुकही केले. आ. जयकुमार गोरे यांनी केलेल्या संघर्षाची नोंद ठेवत दुष्काळी भागात पाणी पोहोचेपर्यंत दुष्काळमुक्तीची लढाई सुरू राहील, असे सांगत पुढच्या 5 वर्षांत एमआयडीसीच्या माध्यमातून हजारो स्थानिकांना नोकर्‍या देण्याची हमी दिली. एकप्रकारे फडणवीसांनी फलटणमध्ये लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

रणजितसिंहांसाठी फलटणात आलेल्या फडणवीसांनी रणजितसिंहांचे पारंपरिक विरोधक असलेल्या; मात्र महायुतीच्या घटकपक्षाचे नेते असलेल्या रामराजे ना. निंबाळकर यांचीही भेट घेऊन माढा लोकसभेची बेरीज साधण्याचा प्रयत्न केला. रणजितसिंहांचे प्रतिस्पर्धी मानल्या जाणार्‍या रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.कराड व फलटण या सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या प्रमुख ठिकाणी जाऊन फडणवीसांनी पैलवानांना खुराक दिला, किस्ताक चढवले. आखाड्यातील कुस्तीच्या दिशेने अंगुली निर्देशही केला. फडणवीसांना कुस्तीतले काय कळते म्हणणार्‍या अनेकांना त्यांनी यापूर्वी लोळवले आहे. राज्याच्या राजकारणात वस्ताद होण्याच्या दिशेने फडणवीसांची वाटचाल सुरू आहे. सातारा जिल्ह्यात येऊन त्यांनी महायुतीच्या शिडात वारे भरले आहे. त्यामुळेच महायुतीतील इच्छुक तालुकावार बैठका घेऊन कामाला लागले आहेत.

Maharashtra Politics : उमेदवार भाजपचा की घटक पक्षाचा?

महायुतीच्या उमेदवारीवरून जोरदार चर्चा सुरू आहेत, सातारा व माढा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचे आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा विनिंग मतदारसंघ आहे. ज्या पद्धतीचे भाषण फडणवीसांनी फलटणमध्ये केले, ते पाहता भाजप माढा सोडणार नाही. रणजितसिंह ना. निंबाळकर हेच भाजपचे उमेदवार राहतील, असे भाजप नेते छातीठोकपणे सांगत आहेत. अशावेळी रामराजे चरणजितसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका कुतुहलाची ठरणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा विनिंग मतदारसंभ आहे. असे असले तरी ही विनिंग सीट शरद पवार गटाकडे आहे. त्यामुळे अजित पवार गटाला दावा करता येणार नाही, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, त्यातच श्री. छ. उदयनराजे भोसले हे जोरदार तयारी करत आहेत. अजित पवार गटाने मात्र साताऱ्याच्या जागेवर दावा केला असून आ. मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे लोकसभेचे अजित पवार गटाचे उमेदवार असतील असे सांगितले जात आहे. याशिवाय महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव हेही इच्छुक असल्याने महायुतीचा उमेदवारीचा तिढा वाढणार आहे. भाजपने उदयनराजेंना डावलले, तर ते कोणती भूमिका
घेणार या विषयीसुद्धा उत्सुकता आहेच.

हेही वाचा 

Back to top button