MPSC Result : ‘असाध्य ते साध्य’: सुप्पा गावच्या लेकीची ‘एमपीएससी’ परीक्षेत उतुंग भरारी | पुढारी

MPSC Result : 'असाध्य ते साध्य': सुप्पा गावच्या लेकीची 'एमपीएससी' परीक्षेत उतुंग भरारी

प्रमोद साळवे

गंगाखेड: ‘असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे’ या उक्तीनुसार एकाच ध्येयावर समाधानी न राहता पुढील सर्वोच्च ध्येय गाठण्याची लिलया किमया तालुक्यातील सुप्पा (जहांगीर) या गावच्या शितल बाळासाहेब घोलप या लेकीने साध्य करून दाखवली आहे. तीन वर्षात राज्य विक्रीकर निरीक्षक, रेंज फॉरेस्ट ऑफिसर नंतर आता उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा राज्यसेवेच्या माध्यमातून उत्तीर्ण होत गंगाखेड तालुक्याची मान तिने गौरवाने उंचावली आहे. MPSC Result

गंगाखेड तालुक्यातील सुप्पा (जहांगीर) गावचे मूळ रहिवासी व सध्या अ. भा. समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला कृषी सहाय्यक पदावर सेवेच्या निमित्ताने परभणीत वास्तव्यास असलेले बाळासाहेब घोलप व शिला घोलप यांची सुकन्या शितल हिने नुकत्याच झालेल्या राज्यसेवा महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत ओबीसी महिला प्रवर्गात राज्यात सर्वप्रथम येत उपजिल्हाधिकारी पदावर विराजमान होण्याचे स्वप्न साकारले आहे. MPSC Result

विशेष म्हणजे शीतलने यापूर्वी विक्रीकर निरिक्षक व रेंज फॉरेस्ट ऑफिसर या दोन्हीही परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून उत्तीर्ण केलेल्या आहेत. तीन वर्षात उप जिल्हाधिकारी पदाची ही तिसरी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अवघड किमया शितल यांनी पार पाडली. सध्या त्या मुंबई येथे एसटीआय पदावर कार्यरत आहेत.

काळ कोणताही असो, काळाच्या कसोटीवर फक्त ज्ञान झळकते, याची प्रचिती तालुक्याची लेक असलेल्या शीतल हिने दिली. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तालुक्यासह जिल्हाभरातून तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

MPSC Result : शैक्षणिक पार्श्वभूमी

शितल घोलप हिची शैक्षणिक गुणवत्ता दहावीपासूनच वेळोवेळी सिद्ध झाली आहे. दहावीत तिने १०० टक्के तर बारावी मध्ये ८५ टक्के गुण घेतले आहेत. शिवाय सीईटी परीक्षेत परभणी जिल्ह्यात मुलीमध्ये सर्वप्रथम येण्याच्या मान मिळवला होता. पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (बी टेक कॉम्प्युटर सायन्स) या पदवी परीक्षेत शितल या शिकत असताना कॅटेलिस्ट संस्थेमार्फत त्यांना सतत तीन वर्ष स्कॉलरशिप प्राप्त झालेली आहे. पुढे मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली. हे प्रशिक्षण तिने यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

हेही वाचा 

Back to top button