

सध्या रब्बीचा हंगाम सुरु झाला असून, शेतीपंपांच्या वीज मागणीत प्रचंड वाढ झाली आहे, तशा विजेच्या तक्रारीही वाढल्याने महावितरण उपक्रम राबवाता आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणने पुन्हा एकदा 'एक गाव- एक दिवस' हा उपक्रम हाती घेतला आहे.
ज्या गावात वीज बिल वसुलीचे प्रमाण चांगले आहे, अशाच गावांमध्ये प्राधान्याने हा उपक्रम राबवून तेथील सर्व वीज समस्या दूर करण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे. महावितरणचा 'एक गाव- एक दिवस' हा उपक्रम वीज समस्यांवर रामबाण उपाय ठरल्याने महावितरणतर्फे संपूर्ण राज्यात तो राबवला जात आहे. या उपक्रमासाठी गावाची निवड करताना सर्वप्रथम त्या गावातून होणार्या वसुलीचा विचार होतो. त्या पाठोपाठ इतर निकष लावून गावात महावितरणची संपूर्ण यंत्रणा एकाच दिवशी जाते. जाताना पुरेसे मनुष्यबळ, साधनसामग्री सोबत असते. यामध्ये विजेचे खांब, तारा, स्टे, किटकॅट, रोहित्राचे ऑईल इत्यादींचा समावेश आहे. तर, वीज बिलांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी लेखा विभागाचे कर्मचारीही सोबत असतात. एकूणच गावातील नागरिकांच्या विजेबाबतच्या सर्व समस्या निवारण्याचे काम या उपक्रमात केले जाते. त्याचा फायदा नंतर वसुलीला होतो.
गावातील झुकलेले, मोडलेले खांब उभे करणे, तारांना ताण देणे, जास्त कल असल्याने मधोमध नवीन खांब उभा करणे, स्पेसर लावणे, रोहित्राची व वितरण पेटीची देखभाल दुरुस्तीची कामे करणे, अनाधिकृत भार काढून त्यांच्यावर कारवाई करणे तसेच नवीन कनेक्शन घेण्यास प्रवृत्त करणे आदी कामे केली जातात. तर, वीज बिलातील त्रुटी, नावात बदल या तक्रारींचेही जागेवर निराकरण करण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याने अनेक गावांतून या उपक्रमासाठी आग्रह धरला जातो. आतापर्यंत बारामती मंडलात 179, सोलापूर 240 तर सातारा मंडलातील 218 गावांत हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे.