सावधान... ‘छलिया शिकारी’ घेतोय नरडीचा घोट | पुढारी

सावधान... ‘छलिया शिकारी’ घेतोय नरडीचा घोट

सातारा : संजीव कदम

कराड तालुक्यात सोमवारी बिबट्याने चार वर्षांच्या चिमुरड्याला ठार केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सातारच्या शाहूनगरसह ठिकठिकाणच्या नागरी वस्तीत बिबट्याचा यापूर्वी झालेला शिरकाव अंगाचा थरकाप उडवणारा आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत याअगोदर बिबट्याचा वावर आढळला असून, या सर्वच बाबींकडे होणारे दुर्लक्ष कुणाच्या जीवावर बेतू नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. बिबट्या नरडीचा घोट घेत असल्याचे दिसून आल्याने वन विभागाने कागदी उपाययोजना नाचवण्यापेक्षा नागरिकांच्या सुरक्षेचे ठोस उपाय अंमलात आणण्याची मागणी सातारकरांकडून हाेत आहे.

बिबट्याचा सातारा शहर व परिसरातील वावर आता नवीन राहिला नाही. मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच बिबट्या दिसल्याने घाबरगुंडी उडाली होती. वन विभागाने त्यावेळी शोध मोहीम राबवूनही त्यांच्या हाती फारसे काही मिळाले नव्हते. शाहूनगर परिसरात तर वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले आहे.

त्याचबरोबर गोळीबार मैदान, रामराव नगर, खिंडवाडी महामार्ग, किल्ले अजिंक्यतारा पायथा, सांबरवाडी, यवतेश्वर, कास पठार अशा अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला आहे. बिबट्या वन विभागाच्या हाताला काही लागत नाही. बिबट्या जंगलात आहे तोपर्यंत ठीक. मात्र, आता बिबट्या नागरी वस्तीत घुसल्याचे अनेक ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे सातारा परिसरातील ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे, त्या ठिकाणी वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

सांगली : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार

मानवी वस्त्यांच्या शिवेवर वावर वाढला…

बिबट्या अतिशय चाणाक्ष, बुद्धिमानी व संधिसाधू स्वभावाचा समजला जातो. असेल त्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेण्यात तरबेज मानाला जातो. सहसा डोंगररांगातील दाट झाडी-झुडपात लपून -छपून जीवन जगणारा बिबट्या अत्यंत ‘छलिया शिकारी’ समजला जातो. मिळेल त्या परिस्थितीत मिळेत ती शिकार करण्याचं कसब अंगी भिनलेले बिबटे जंगले नष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणत विस्थापित होत आहेत. पोटाची भूक शमविण्यासाठी पारंपरिक शिकार मिळत नसल्याने ते साहजिकच मानवी वस्त्यांकडे आकर्षिले जात आहेत.

मानवी वस्त्यांच्या शिवेवर येऊन मिळेल त्या भक्ष्याची शिकार करताना त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष आता आणखी कठीण होत चालल्याची लक्षणे स्पष्ट दिसू लागली आहेत. सध्या अशाच बिबट्यांनी सातार्‍याच्या डोंगरालगत व जिल्ह्याच्या डोंगर परिसरातील उसाच्या रानात ठाण मांडले असून, पारंपरिक शिकार मिळत नसल्याने या परिसरातील पाळीव प्राण्यांपाठोपाठ त्यांनी माणसांवरही हल्ले सुरू केले आहेत. कराड तालुक्यातील सोमवारची घटनाही त्याचाच परिपाक आहे.

शेतकरी व नागरिकांनी अशी घ्यावी काळजी

शेतकर्‍यांनी पाळीव जनावरे शक्यतो बंदिस्त गोठ्यात ठेवावीत.शेतात एकट्याने जाण्याची वेळ येईल त्यावेळी ध्वनिनाद निर्माण करावा.सायंकाळी 6 ते 9 व पहाटे 5 ते 7 या वेळेत बिबटे शिकारीसाठी तयार असल्याचे अभ्यासाअंती पुढे आले आहे. शक्यतो या वेळेत लहान मुले, स्त्रिया व एकट्याने बाहेर पडणे टाळावे. बिबट्या शक्यतो उभ्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. खाली बसलेली, वाकलेली व्यक्ती म्हणजेच त्याच्या नजरेच्या टप्प्यातील आकृती यास तो सावज समजून हल्ला करू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत वाकणे, खाली बसने टाळा.

उसाच्या शेतात बसल्याजागी बिबट्यांना लपण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने ऊस लागवड क्षेत्रात हमखास बिबट्याचा वावर वाढत आहे.बिबट्या नजरेस पडला तर त्याला घेराव घालणे कटाक्षाने टाळले पाहिजे. घेराव घातल्याने, त्याला डिवचल्याने बिबटे उग्र होऊन जीवघेणे हल्ले करू शकतात. ज्या भागात बिबट्यांचा वावर वाढतो त्या ठिकाणी नागरिकांनी आपली दैनंदिन कामे करतांना अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

बिबट्याला शिकार आठवडाभर पुरते…

बिबट्याने एकदा शिकार केली की ती त्याला आठवडाभर पुरते. एका प्रौढ बिबट्यास दिवसाला सरासरी अडीच ते तीन किलो मांस लागत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

आईकडून शिकली जाते शिकार करण्याची पद्धत…

मादी बिबट्या एका वेळेस दोन ते चार पिलांना जन्म देते. त्यातील निम्मी पिल्ले त्यांच्या वयाची दोन महिनेही पूर्ण करू शकत नाहीत. जी काही जगतात, त्यांचे आई संगोपन करते. याकाळात त्यांना आईकडून शिकार करण्याच्या पद्धतीचे ज्ञान अवगत होते. याकाळात ते शिकार करण्यायोग्य होताच आई त्यांना दूर करते. त्यानंतर पूर्ण वाढ झालेले बिबटे त्यांचा स्वतंत्र अधिवास शोधून आयुष्य सुरू करत असल्याचे यासंदर्भातील अभ्यासकांनी स्पष्ट केले.

वन विभागाने राहावे अ‍ॅलर्ट…

वनविभागाने बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पिंजर्‍यांची संख्या वाढवावी.
उपद्रव असलेल्या गावांमध्ये व शहर परिसरातील नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांसंदर्भात जागरूक करणे. बिबट्यांच्या सवयींचा, जीवन जगण्याच्या पद्धतीचा सखोल अभ्यास करून उपाययोजनांची गरज. परिसरात कायमस्वरूपी वन कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे गरजेचे.अ‍ॅन्टी रेबीज लस व इमर्जन्सी उपचारासाठी लागणारी सर्व वैद्यकीय सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध असणे गरजेचे आहे.

Back to top button