पीएम मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

पीएम मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला : पृथ्वीराज चव्हाण

कराड : पुढारी वृत्तसेवा

दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागृती अभियान यात्रा सुरू करण्यात आली आहे. कराड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी हटाव देश बचाव अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेली असून सरकारी खर्चातून त्यांनी कोरोना लसीकरणातही जाहिरातबाजी केली आहे. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. मोदी सरकारला आंदोलनाची नव्हे तर निवडणुकीची भाषा कळते त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना सत्तेपासून बाजूला करा, असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केली. देशात केवळ २५ टक्के लोकांना दोन डोस देण्यात आले आहेत. अद्याप ७५ टक्के लसीकरण बाकी आहे. भाजप सरकारची कुचकामी धोरणे जनतेच्या लक्षात आणून द्यावी लागतील. यासाठी जनतेमध्ये जागृती करावी लागेल. त्यासाठी तळागाळात जाऊन कार्यक्रम राबवावा लागेल. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

कोल्हापूर नाक्यापासून मोर्चास प्रारंभ झाला हा मोर्चा मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर आला. यावेळी अनेकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनात काँग्रेसचे निरीक्षक ट्रेनिंग चव्हाण प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रजनीताई पवार, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर तालुका अध्यक्ष हेमंत जाधव, शहराध्यक्ष नगरसेवक आप्पा माने, महिला आघाडीच्या विद्याताई थोरवडे, नगरसेवक इंद्रजीत गुजर, काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलमताई येडगे, पंचायत समिती सदस्या वैशाली वाघमारे, शरद काटकर, ॲड. पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. प्रारंभी कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिलांनी चुली पेटवून भाकरी बनविल्या.

Back to top button