सातारा: म्होप्रे येथे सव्वा लाखाचा गांजा पकडला | पुढारी

सातारा: म्होप्रे येथे सव्वा लाखाचा गांजा पकडला

कराड: पुढारी वृत्तसेवा : म्होप्रे (ता.कराड) येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे ११.८७० किलोग्रॅम वजनाची गांजाची पाच झाडे जप्त केली. त्याची किंमत अंदाजे १ लाख २६ हजार ९२० रुपये आहे. कराडचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.

कराड तालुक्यातील म्होप्रे येथील सोमनाथ पांडुरंग जाधव यांच्या मालकीच्या शेतात गांजा पिकाची लागवड केली असल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पुजारी, सहाय्यक फौजदार सपाटे, पोलीस हवालदार महेश लावंड, असिफ जमादार, प्रवीण पवार, धनंजय कोळी, समीर कदम, नितीन कुचेकर, पोलीस नाईक सागर बर्गे, दीपक कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत पवार, प्रफुल्ल गाडे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी केलेल्या सूचनेनुसार पोलीस पथकाने म्होप्रे गावच्या हद्दीतील बेघर वसाहतीच्या शेजारील सोमनाथ जाधव यांच्या मालकीच्या शेतात छापा टाकला. त्यावेळी तेथे पोलीस पथकाला सुमारे ११.०४८ किलोग्राम वजनाची पाच गांजाची झाडे तसेच संशयिताच्या घरातून सुमारे ८२२ ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण ११.८७० किलोग्रॅम वजनाचा १ लाख २६ हजार ९२० रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने म्होप्रेसह परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा 

Back to top button