

खंबाटकी बोगद्याजवळ धोमबलकवडी कालव्या शेजारील उतारावर दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे (रा. सासवड जि. पुणे) हा घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. या अपघातातील दुचाकी पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला घेत मृतास अॅम्ब्युलन्समधून खंडाळा रुग्णालयात पाठवले.
दरम्यान, काही वेळात उतारावरून भरधाव वेगात आलेला मालट्रक क्र .KA- 27 – A – 9019 ने डस्टर, क्रेटा व इर्टिका कारला धडक दिली. यामध्ये क्रेटा कारचा पूर्ण चक्काचूर झाला. खंडाळा व महामार्ग पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. जखमी सहा जणांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले.
दिवाळी सुट्टी संपल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. अपघात स्थळापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व जखमी खराडी (पुणे) येथील आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. जखमी लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी मदत केली.