

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : जून महिन्याच्या अखेरीस मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कण्हेर परिसरात पेरणीसह मशागतींच्या कामांना वेग आला आहे. गेल्या चार दिवसापासून सकाळ व संध्याकाळ मान्सूनच्या रिमझिम सरी बरसू लागल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून खरिपाच्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे. परिसरातील शेतांमध्ये शेतकऱ्यांची शेतातील अंतर्गत मशागतींसह पेरणीची लगबग दिसून येत आहे.
जून महिना संपत आला तरी मान्सून न बरसल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र गेल्या चार दिवसापासून दमदार पाऊस पडल्याने संपूर्ण चित्र बदलले आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतातील जमीन भुसभुशीत होऊन मशागत व पेरणी करणे सोपे जाऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतींबरोबर पेरणीच्या कामाला जोमात सुरुवात केली आहे. तर मान्सूनच्या आशेवर अडसाली ऊस लागणीलाही सुरुवात झाली आहे.
या परिसरात मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकांची टोकणी व पेरणीवर भर दिला जात आहे. भात, भुईमूग, घेवडा, मुग, उडीद यांचीही पेरणी केली जात आहे. बहुतांश ठिकाणी शेतीच्या नांगरणी व पेरणीसाठी बैलांचे औत व ट्रॅक्टरच्या साह्याने शेती केली जात आहे. जलसिंचन योजनेच्या आधारे लावलेल्या भाताच्या तरव्यांना पावसाने चांगले जीवदान दिले आहे. पेरणी योग्य पाऊस बरसला असला तरी शेतकरी दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा करत आहे.
हेही वाचा :