खोक्यांच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण; खा. संजय राऊत यांचा घणाघात | पुढारी

खोक्यांच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण; खा. संजय राऊत यांचा घणाघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाळासाहेब देसाई यांची महाराष्ट्राला लोकनेता म्हणून ओळख होती. मात्र शंभूराज देसाई यांना कधीच लोकनेता होता येणार नाही. ते फेक नेते आहेत, अशी जहरी टीका करत खोक्याचा जो भूकंप झाला त्याचा केंद्रबिंदू पाटण आहे, असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केला.

मल्हारपेठ (ता. पाटण) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे- आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खा. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राला बाळासाहेब देसाई यांची ओळख लोकनेते म्हणून होती आणि राहील. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा अत्यंत घरोबा होता. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब देसाई हे खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले होते. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांची संघटना, मराठी अस्मितेसाठी काम करणारी शिवसेना, मुंबई राहायला पाहिजे, वाढायला पाहिजे. सातारा, पाटण भागातला तिकडे काम करणारा कष्टकरी मराठी माणूस आहे.

मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. आपण शिवसेनेच्या मागे उभे राहिला पाहिजे. मात्र शंभूराज देसाईंना कधीच लोकनेता होता येणार नाही.

खोक्याचा जो भूकंप झाला त्याचा केंद्रबिंदू पाटण आहे. महाराष्ट्रात भूकंप झाला की अगोदर पाटणला केंद्रबिंदू शोधला जातो आणि त्याचे केंद्र पाटणच्या आसपासच असते. अनेक धक्के पचवत पाटण, सातारा उभा राहिला आहे. त्यामुळे येथील जनतेला धक्क्याचे फार काही वाटत नाही. हा कसला धक्का आहे. त्याच्यापेक्षा आमच्या मुंबईतील भाऊचा धक्का चांगला आहे. २०२४ ला सर्व हिशोब पूर्ण केला जाईल.

Back to top button