चिपळूण : खवले मांजराच्या खवल्‍यांची तस्‍करी; दोघे वन विभागाच्या जाळ्यात | पुढारी

चिपळूण : खवले मांजराच्या खवल्‍यांची तस्‍करी; दोघे वन विभागाच्या जाळ्यात

चिपळूण; पुढारी वृतसेवा विभागीय वनअधिकारी चिपळूण यांना लोटे येथे दोन अज्ञात व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्याकरीता येत असल्याची खबर मिळाली. त्‍यावरून दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोटे येथे महामार्गावर सापळा लावला. यावेळी पोलिसांनी खवल्यांच्या तस्‍करीसाठी आलेल्या एका महिलेसह मुंबई येथील एकाला अटक केली आहे.

रविवारी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता, सदर दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये खवले मांजराचे खवले असल्याचे व ते विक्रीसाठी तेथे आले असल्याचे आढळून आले. यानंतर दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यामध्ये संशयीत आरोपी मिलींद वसंत सावंत (वय ५५) राहणार मालाड (मुंबई) व सौ. मिना मोहन कोटिया (वय ६२) राहणार लोटे (ता. खेड) या दोघांकडून खवले मांजर या प्राण्याचे ०.९३० किलोग्रॅम इतके खवले जप्त केले. सदर दोन्ही संशयीत आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतले आहे.

ही कारवाही दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) व रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक सातारा) यांच्या नेतृत्वामध्ये पी. जी. पाटील, परिक्षेत्र वनअधिकारी दापोली, वैभव बोराटे (परिक्षेत्र वनअधिकारी फिरते पथक रत्नागिरी) यांच्यामार्फत करण्यात आली.
सदर धडक मोहिमेत सुरशे उपरे वनपाल खेड, साताप्पा सावंत वनपाल दापोली, उमेश आखाडे वनपाल सावर्डे, तसेच म. शुभांगी गुरव वनरक्षक, अशोक ढाकणे वनरक्षक, अश्विनी जाधव वनरक्षक कृष्णा इरमले वनरक्षक हे सहभागी झाले होते. पुढील तपास पी. जी. पाटील परिक्षेत्र वनअधिकारी दापोली व राजश्री किर परिक्षेत्र वनअधिकारी चिपळूण हे करीत आहेत.

हेही वाचा :  


Back to top button