सातार्‍यात शिवप्रेमींकडून बाईकचा थरार; शिवतीर्थासह परिसर दुमदुमला | पुढारी

सातार्‍यात शिवप्रेमींकडून बाईकचा थरार; शिवतीर्थासह परिसर दुमदुमला

सातारा; पुढारी वृत्तसेवा : श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने आयोजित बाईक रॅलीस शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले रॅलीत सहभागी झाल्याने शिवप्रेमींनी जल्लोष केला. या बाईक रॅलीचा सातारकरांनी थरार अनुभवला.

शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.३०) पोवईनाक्यावरील शिवतीर्थ ते राजवाडा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शिवप्रेमींनी सायंकाळपासूनच पोवईनाका परिसरात प्रचंड गर्दी केली होती. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सव समितीकडून ठिकठिकाणी उभारलेल्या कमानी लक्ष वेधून घेत होत्या. शिवतीर्थावर शिवप्रेमींचे जथ्येच्या जथ्ये दाखल होत होते. हलगी व ढोल ताशांच्या गजराने कार्यक्रमास रंगत आणली. आयोजकांच्यावतीने उपस्थितांना भगवे फेटे घालण्यात आले. यासह उपरणे यांच्याही वाटप करण्यात आले. यामुळे शिवतीर्थ भगवे झाले होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘जय भवानी.. जय शिवाजी,’ ‘हर.. हर महादेव,’ अशा घोषणांनी शिवतीर्थ दुमदुमून गेले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुनील काटकर, मनोज शेंडे, पंकज चव्हाण, किशोर शिंदे, राजू भोसले, राजू गोरे, संग्राम बर्गे, पत्रकार शरद काटकर, श्रीकांत आंबेकर, रवींद्र माने, प्रितम कळसकर, रवींद्र झुटिंग, शंकर माळवदे, स्मिता घोडके आदि प्रमुख उपस्थित होते. या रॅलीत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते.

हेही वाचा;

Back to top button