

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघातल्या (Hatkanangle Loksabha) राजकीय घडामोडींची जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. शिवसेने अंतर्गत दोन्ही गट, स्वाभिमानी शेतकरी संघटने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील या मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. जिल्हा बँकेचे संचालक आणि 'उदय' साखरचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. तसे त्यांनी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांपुढे मनातील इरादा बोलून दाखवला असल्याचे निकट वर्तुळातून बोलले जात आहे. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत रणवीरसिंग गायकवाड यांच्या या भूमिकेबाबत चर्चाही झाल्याचे वृत्त आहे. (Candidate Ranveer Singh Gaikwad)
दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील नेमका कोणत्या पक्षाकडे दिला जाणार आहे, हे अद्याप निश्चित झालेले नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पातळीवर एकमेव गायकवाड यांचे नाव पुढे आले आहे. त्यासाठी माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अनुकूलता दर्शविली असल्याचे समजते. (Hatkanangle Loksabha Candidate)
मुंबईतील पक्षाच्या बैठकीस जिल्ह्यातून माजी मंत्री हसन मुश्रीफ, आ. राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, माजी आ. के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे प्रमुख नेते उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीसाठी सद्या अनुकूल राजकीय वातावरण असल्याचे हेरून तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी समन्वयाने आणि सबुरीने आपापल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याची नीती अवलंबली आहे. याच अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही मध्यंतरी कोल्हापूरचा धावता दौरा केला. दोन्ही नेत्यांच्या समक्ष जिल्ह्यातील आघाडीच्या नेत्यांची बरीचशी खलबते झाली. यामध्ये अजित पवार यांनी नेत्यांना कानपिचक्या देत स्वतःच्या तालुक्यापुरते किंवा मतदारसंघापुरते पक्षाचे अस्तित्व मर्यादित न ठेवता परिघाबाहेर जाऊन पक्ष वाढीसाठी मेहनत करण्याचा सल्ला दिला. याचवेळी हसन मुश्रीफ यांनी रणवीरसिंग गायकवाड हे हातकणंगले मधून तयारीला लागल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. आणि पक्ष म्हणून आम्ही त्यांना लागणारी मदत करत आहोत, असेही सांगितले. यानंतर खऱ्या अर्थाने गायकवाड यांच्या नावाची चर्चा मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शाहूवाडी विधानसभा क्षेत्रातील ठाकरे गटाचे कट्टर समर्थक माजी आ. सत्यजित पाटील-सरूडकर, राष्ट्रीय काँग्रेसचे कर्णसिह गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड हे गट मनापासून एकत्र आले तर येथे महाविकास आघाडीच्या पदरात मोठे मताधिक्य पडू शकते. शिवाय आ. राजूबाबा आवळे (हातकणंगले), माजी आ. सुजित मिणचेकर, माजी आ. उल्हास पाटील (शिरोळ), तसेच इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांची मदत होऊ शकते. सांगली जिल्ह्यातील वाळवा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर शिराळ्यात आमदार मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक या मातब्बर नेत्यांची असणारी ताकद फायदेशीर ठरेल. असे एकंदरीत गणित पक्षाच्या व्यासपीठावर मांडले गेल्याची चर्चा आहे.
रणवीर गायकवाड यांचे वडील मानसिंगराव गायकवाड यांनी त्यांचे वडील काँग्रेसनिष्ठ माजी खासदार (स्व.) उदयसिंगराव गायकवाड यांचा विरोध झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतली. त्याचा त्यांना राजकिय फायदाही झाला. कोल्हापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष, त्यानंतर राज्याचे उपाध्यक्ष म्हणून ते आज पवार घराण्याच्या निकटवर्तीय वर्तुळात गणले जात आहेत.
माजी खासदार (स्व) उदयसिंगराव गायकवाड हे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ. कोल्हापूरचे सलग पाच टर्म खासदार, त्याआधी शाहूवाडीतून तीन वेळा आमदार आणि काही काळ राज्यमंत्री पदही त्यांनी भूषवले होते. तब्बल साडेतीन दशकाहून अधिक काळ जिल्ह्यात मोठा दबदबा निर्माण केला होता. मंडलिक, कुपेकर, बाबासाहेब पाटील-सरूडकर, संजयसिंह गायकवाड अशी राजकीय वारसदारांची फळी उभी केली. धुरंधर आणि मुरब्बी नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांचे नातू रणवीरसिंग गायकवाड यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक साधली आहे. आजोबा गायकवाड साहेबांची सढळ हस्ते झालेली मदत न विसरलेला जुना गट अजूनही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू शकतो, अशी रणवीरसिंग यांना खात्री वाटते. त्याचबरोबर आई शैलेजादेवी या बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या दोन टर्म सदस्य राहिलेल्या आहेत. जिल्हा बँक तसेच उदय साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वतः रणवीरसिंग हे शेतकरी, तरुणवर्गापर्यंत पर्यायी विविध मार्गाने पोहोचताना दिसतात. ही त्यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुरू असणारी 'तालीम'च म्हणावी लागेल.
हेही वाचा