सातारा : महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय : आ. पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

सातारा : महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय : आ. पृथ्वीराज चव्हाण

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग केला. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून याला मिळत असलेले यश पाहता हा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. या पोटनिवडणुकीचे दूरगामी परिणाम होतील, असे प्रतिपादन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कराड येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण उपस्थित होते.

महाविकास आघाडीला मिळत असलेले यश पाहून भविष्यातही स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी यशस्वीपणे हाच प्रयोग राबवणार आहे. महाविकास आघाडीला मिळत असलेल्या यशामुळेच निवडणुका घेण्याचे धाडस सत्ताधारी करत नाहीत. म्हणूनच निवडणुका लांबत चालले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या असत्या तर अनेक लोकांना संधी मिळाली असती. परंतु लोकशाहीचा गळा दाबण्याचा व लोकशाहीचा खून करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याच्या विरोधात महाविकास आघाडी उभी आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पदयात्रा काढली. त्याला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हात से हात जोडो कार्यक्रम हाती घेतला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर वैध्यतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी सुरू असून त्याचा लवकरच निकाल लागेल. परंतु, निवडणूक आयोगाने गडबडीत शिवसेनेचे चिन्ह व पक्षाबाबत निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टावर दबाव टाकण्याच्या हेतूनेच घेतला असावा, असा आमचा आरोप आहे.

निवडणूक आयोगाच्या नेमणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार होतील, असे सुचित केले आहे. त्यामुळे सध्या निवडणूक आयोगाचे असलेले तीन सदस्य बदलण्याची मागणी आम्ही केली आहे. परंतु, त्यावर केंव्हा निर्णय होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून अनेक निर्णय घेतले जात असल्याने भविष्यात सध्या असलेलेच निवडणूक आयोगाचे तीन सदस्य राहिल्यास निवडणुका निपक्षपातीपणे होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन तीन सदस्य निवडणूक आयोगाची नेमणूक करण्याची मागणी करत आहोत, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेले अधिवेशन 24 तारखेपर्यंत चालेल यामध्ये बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने केलेले आंदोलन यासह विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या विधिमंडळात पक्षाच्या दोन बैठका झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा;

Back to top button