अश्लील गुरुजी नको गं बाई! कोल्हापूरच्या शिक्षकाची साताऱ्यात बदली; तीव्र पडसाद | पुढारी

अश्लील गुरुजी नको गं बाई! कोल्हापूरच्या शिक्षकाची साताऱ्यात बदली; तीव्र पडसाद

पाचगणी; इम्तियाज मुजावर : मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या कोल्हापुरातील व्ही. पी. बांगडी या शिक्षकाची साताऱ्यात बदली करण्यात आली आहे. पण हा शिक्षक साताऱ्यातही नको, याला कायमचा घरी बसवला पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांतून उमटत आहेत. या घनटनेनंतर राज्यभर शिक्षण विभागामधूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील एका माध्यमिक शाळेतील इंग्रजी विषयाचा शिक्षक व्ही. पी. बांगडी याने विद्यार्थिनींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत चुकीचे वर्तन केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील चित्रफितीही दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात धक्कादायक प्रकार घडल्यानंतर या गुरुजीच्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची तात्काळ बदली सातारा जिल्ह्यात केली आहे. पण हा गुरुजी आता सातारा जिल्ह्यातील शाळांमध्येही नको, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. सातारा जिल्ह्यात या शिक्षकाची बदली झाल्याची बातमी कळताच जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. शिक्षण विभागातून अश्लील गुरुजी नको गं बाई! असा सूर उमटू लागला आहे. साताऱ्याला ऐतिहासिक वारसा आहे. अशा प्रवृत्तीचा गुरुजी जिल्ह्यात नको, अशी मागणी केली जात आहे.

विद्यार्थिनींना अश्लील चित्रफिती दाखवण्याचा प्रयत्न

शेळेवाडीतील एका माध्यमिक शाळेमध्ये इंग्रजी विषयाच्या व्ही. पी. बांगडी या शिक्षकाने इयता 8 वी ते 10 च्या आठ ते दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे. मुलींच्या खांद्यावर हात टाकणे, खिशात हात घालणे, असे किळसवाणे प्रकार या शिक्षकाने केले होते. तसेच अश्लील चित्रफितीही दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु, भीतीपोटी मुलींनी पालकांना याची माहिती दिली नाही. याबाबतची कुणकूण लागल्यानंतर सरपंचांसह सदस्यांनी संबंधित संस्थाचालकांना भेटून या गंभीर घटनेची माहिती दिली. त्यानंतर या शिक्षकाची सातारा जिल्ह्यात तात्काळ बदली करण्यात आली. यानंतर पीडित विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्यासाठी सोमवारी गीता हसूरकर यांना या शाळेकडे पाठविण्यात आले. हसूरकर यांच्याशी बोलताना संबंधित विद्यार्थिनींनी आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, यापूर्वीही या शिक्षकाने दुसर्‍या ठिकाणी असाच प्रकार केल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे त्याची शेळेवाडीस बदली करण्यात आली होती. संबंधित शिक्षकाची बदली न करता त्याला कायमचे निलंबित करावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

Back to top button