

नेवासा(नगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धामोरीतील अंगणवाडीत लहान मुलांना भेसळयुक्त निकृष्ट आहाराचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे चिमुकले आजारी पडले आहेत. भेसळ करणार्यांवर गुन्हा दाखल करा, बचत गटाचा परवाना रद्द करण्यात यावा. अन्यथा बालगोपाळांसह नेवासा तहसल कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात पंचायत समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धामोरी येथील अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार लहान मुलांना वाटप करण्यात येत आहे.
त्यामध्ये भेसळयुक्त पामतेलाचा वापर केला जात आहे. तर, साखरेचेही पाणी होऊन त्याचे गोळे झालेे आहेत. तांदूळही रेशनचा वापरला जात आहे धामोरी येथे अंगणवाडी सुरु झाल्यापासून लहान मुलांना नाश्ताच दिला जात नाही. मात्र, तो रेकॉर्डला दाखविला जात आहे. ज्या बचत गटामार्फत या अंगणवाडीला आहार दिला जातो, त्यामध्ये भेसळ केली जात आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करणार्यांवर गुन्हा दाखल करून बचत गटाचा आहाराचा परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.