सातारा : फलटण येथे घोडे, उंट, हत्ती यांच्या लवाजम्यासह नितीन गडकरींचे जंगी स्वागत | पुढारी

सातारा : फलटण येथे घोडे, उंट, हत्ती यांच्या लवाजम्यासह नितीन गडकरींचे जंगी स्वागत

तरडगाव : पुढारी वृत्तसेवा : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. फलटण येथील छ. शिवाजी चौक ते यशवंतराव चव्हाण विद्यालय या मार्गावरून हत्ती, उंट, घोडे तसेच ढोल पथक, हालगी पथक, संभळ पथक, झांज पथक, गजी पथक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंत्री गडकरी यांचे स्वागत करण्यात आले. मंत्री गडकरी यांचे फलटण विमानतळावर आज (दि.२७) दुपारी २ वाजता आगमन झाले. त्यांचे स्वागत माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

गडकरी यांच्या स्वागतासाठी सकाळी १० वाजल्यापासून विविध पारंपरिक वाद्यांच्या आवाजाने फलटण दुमदुमले होते. विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान केलेले गजी, उड्या मारत कडकड वाजणारी हलगी, संभळ, त्याचप्रमाणे ढोल आणि झांज पथकाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. सातारा जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी आज फलटण (सातारा), महाराष्ट्र येथे १,५३९ कोटी रुपये किंमतीच्या व १३६.८९८ किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आज करण्यात आले.

माढा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामासंबंधी गडकरी यांनी सुमारे १५३९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्या निमित्त मंत्री गडकरी यांची भव्य दिव्य अशी नेत्रदीपक मिरवणूक फलटण शहरातून काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.

फलटण शहरातील विविध व्यापारी, डॉक्टर्स, शेतकरी, कामगार वर्गाने मिरवणुकीदरम्यान फुलांची उधळण करून गडकरींचे स्वागत केले. आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाचे काम मार्गी लावल्याबद्दल टाळ, मृदंग, वीणा, तुळशी वृदांवन हाती घेऊन वारकरी देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button