महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर! वेण्णालेक परिसरात नौकाविहारासाठी गर्दी

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर (Mahabaleshwar) शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणातील या बदलामुळे पर्यटक सुखावले आहेत. परंतु स्थानिकांच्या आरोग्याबाबतच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाबळेश्वर (Mahabaleshwar) शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला असून महाबळेश्वरची नजाकत दाखवत आहे. वेण्णालेक येथे नौकाविहार पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. पर्यटक या गुलाबी थंडीमुळे सुखावले असून वीकेंडला या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहेत. वेण्णालेक परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. तर वेण्णालेक, लिंगमळा परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये थंडीपासून बचावासाठी अनेक जणांनी शेकोट्याही पेटवल्या आहे.
परंतु, स्थानिकांच्या आरोग्या बाबतच्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्याने मुख्य थंडीपासून बचावासाठी पर्यटकांसह स्थानिक कानटोपी, मफलर, स्वेटरच्या खरेदीमध्ये वाढ झाली असून परिधान करून घराबाहेर पडतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय, महाविद्यालयीन सहलींना ब्रेक लागला होता. मात्र यंदा महाबळेश्वरात रेकॉर्डब्रेक सहली येत आहेत. महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातून सहली येत आहेत. किल्ले प्रतापगड, हस्तकला केंद्र, क्षेत्र महाबळेश्वर तसेच प्रमुख प्रेक्षणीय स्थळांवर विद्यार्थ्यांची चांगली गर्दी तसेच रेलचेल सुरू आहे. तर सायंकाळी मुख्य बाजारपेठेत देखील मोठया प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.
.हेही वाचा
कामशेत : महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
रायगड : बोरघाटात सुदैवाने बस झाडाला अडकली; ६४ विद्यार्थी थोडक्यात बचावले