सातारा : खंडाळा तालुक्यात पावसाचा हाहाकार; लोणंदच्या खेमावती नदीला महापूर | पुढारी

सातारा : खंडाळा तालुक्यात पावसाचा हाहाकार; लोणंदच्या खेमावती नदीला महापूर

लोणंद; पुढारी वृतसेवा : खंडाळा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक गावांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोणंदला खेमावती नदीला पूर आला असुन सोमवारी लोणंद-शिरवळ प्रमुख मार्ग रात्रभर बंद होता. पावसामुळे लोणंदला दोन घरे पडली, कोपर्डेत दोन मोटारसायकली वाहून गेल्या, खेड बु॥ चे स्मशानभूमी शेड वाहून गेले तर वाघमारे वस्तीत पाणी शिरले. एकंदरीत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोणंद परिसरात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. खेमावती नदीवरील तुळशी वृंदावन धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने खेमावतीला मोठा पूर आला. खंडाळा तालुक्याच्या ग्रामीण भागातीलही जनजीवन विस्कळीत झाले. खेमावती नदीच्या पुरामुळे माळी आळीतील म्हस्कोबानाथ मंदिर व चोपन वस्तीकडे जाणारे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती. या ठिकाणी दोन घरे पाण्याखाली जाऊन नुकसान झाले. लोणंद-शिरवळ रस्त्यावरील पुलावरूनही पाणी गेल्याने रात्री अकरापासून वाहतुक ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. लोणंद, शिरवळ एमआयडीसीत जाणारे कामगारही पावसामुळे कंपनीत जाऊ शकले नाहीत. कोपर्डेत दोन मोटारसायकली वाहुन गेल्या. खेड बु॥ येथील स्मशानभूमीचे शेड वाहून गेले. मोर्वे-लोणंद व मोर्वे-शिवाजीनगर पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही रस्तावरील वाहतूक बंद होती.

हेही वाचा :

Back to top button