

नवी दिल्ली : 'दुधापेक्षा दुधावरची साय अधिक प्रिय असते' तसे मुलांपेक्षाही नातवंडांवर आजी-आजोबांचा अधिक जीव असतो. मुलांना गोष्टी सांगणे, त्यांच्यावर संस्कार करणे या गोष्टी आजी-आजोबांच्या सहवासात घडत असतात. आजी-आजोबांच्या सहवासात राहणं, त्यांच्याकडून जुन्या गोष्टी ऐकणं हा एक मजेदार अनुभव असतो. मात्र, आजच्या व्यग्र जीवनशैलीत मुलांना आजी-आजोबांसोबत राहण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. मात्र, असे करणे त्यांच्यासाठी लाभदायकच ठरते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत फक्त पालकांसोबत राहणारी मुले सहसा इतर लोकांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. आजी-आजोबांच्या उपस्थितीमुळे मुले केवळ त्यांच्याबरोबर वेळ घालवत नाहीत तर त्यांच्या काही गोष्टींचेही पालन करतात. तसेच, सुट्टीच्या काळात आजी-आजोबांच्या घरी भेट दिल्याने मुलांना कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मिसळता येते आणि सामाजिक जीवनाचा आनंद मुक्तपणे घेता येतो.आजोबांबरोबरच मुले सर्व मोठ्यांकडे आदराने पाहतात आणि त्यांच्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष करत नाहीत.
आजी-आजोबांसोबत किंवा संयुक्त कुटुंबात राहिल्याने मुलांचे मनोबल वाढते. अशा परिस्थितीत मुले प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर अडचणींना घाबरण्याऐवजी त्यांचा खंबीरपणे सामना करण्यावर त्यांचा विश्वास वाढतो. याशिवाय आजी-आजोबांसोबत राहिल्याने मुलांमध्ये समर्पण आणि सहकार्याची भावना निर्माण होते.