कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीत शिंदे गटाने खाते उघडले | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीत शिंदे गटाने खाते उघडले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने जिल्ह्यात आपले खाते उघडले. फये (ता. भुदरगड) ग्रामपंचायतीच्या झालेल्या अतितटीच्या लढतीत शिंदे गटाचे आ. प्रकाश आबिटकर यांच्या उमेदवाराने बाजी मारली. सरपंचपदाच्या निवडणुकीत नकुताई साताप्पा धुरे 446 मतांनी विजयी झाल्या.

जिल्ह्यात तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये फये ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे आ. प्रकाश आबिटकर व भाजपचे राहुल देसाई यांनी एकत्र येत राष्ट्रवादी विरोधात आघाडी केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 48 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

बरगेवाडी (ता. राधानगरी) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय गट, तट बाजूला ठेवत स्थानिक आघाडी करण्यात आली होती. त्यामुळे टोकाची ईर्ष्या या निवडणुकीत पाहावयास मिळाली.

सरपंचपदाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीत जयवंत बरगे यांना 176 तर संतोष बरगे यांना 174 मते पडली. इसापूर (ता. चंदगड) ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडी केली होती. यात आघाडीला पाच व राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या.

Back to top button