सातारा:पुढारी वृत्तसेवा: चार महिन्यांपूर्वी सातार्यातील नटराज मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांनी जवळून पिस्तुलींमधून गोळ्या झाडत अर्जुन यादव उर्फ राणा याचा खून केलेल्या घटनेला चार महिने झाले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सज्ञान दोघांविरुध्द नियमित न्यायालयात तर अल्पवयीन मुलांनाही शिक्षा लागावी यासाठी चार्जशीट तयार करुन त्याचा प्रस्ताव पाठवला आहे.
बारक्यांनाही शिक्षा लागावी यासाठी पोलिसांनी फिल्डींग लावल्याची जिल्ह्यातील पहिलीच केस असून बाल न्यायालयाकडे आता लक्ष लागले आहे. अभिजीत उर्फ भैय्या मोरे, सोमनाथ उर्फ सोन्या शिंदे (दोघे रा.रविवार पेठ, वाई) अशी सज्ञान आरोपींची नावे असून सध्या ते कारागृहात आहेत. तसेच यामधील प्रत्यक्ष ज्यांनी फायरिंग केले ती अल्पवयीन मुले बालसुधार गृहात आहेत. यातील एकाची रवानगी पुणे बाल सुधारगृहात तर दोघांना जामीनावर सोडण्यात आले आहे.
दि. 2 जुलै रोजी भुईंज, वाईमधील युवकांच्या गँगवॉरमधून संशयित पाच जणांनी कट रचून अर्जुन राणा याचा सातार्यात खून केला. एलसीबी पथकाने गँगवॉरमधूनच खून झाल्याचे सांगितल्यानंतर राणा सातार्यात कसा आला? याचा तपास केला असता त्यासाठी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामचा वापर झाल्याचे समोर आले. संशयितांनी युवतीचे बनावट अकाऊंट काढून राणा याला भेटायला सातार्यात बोलवले. त्याने मुलगी समजून सातार्यात येण्याचे मान्य केल्यानंतर अल्पवयीन मुलांनी त्यांच्या बंदूकीतून गोळ्या झाडत राणाचा मर्डर केला.
दरम्यान, नटराज मंदिर खून प्रकरणात तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सातार्यातील बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली. काही दिवसांनी त्यांचा जामीन झाला. यातील दोघांना कॉलेज प्रवेश प्रक्रिया पार पाडायची होती. तिसरा संशयित मात्र वाई परिसरात धारदार हत्यार घेवून सापडल्याने त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्याची वर्तणूक पाहून सातार्यातून त्याची पुढे पुणे सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
कोणत्याही गुन्ह्यात संशयित आरोपीचे वय 16 वर्षांपेक्षा अधिक असेल तर शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. यासाठी पोलिस अल्पवयीन मुलांचे चार्जशीट तयार करुन जेन्युआईल जस्टीस (जेजे) कोर्ट हे बालसुधार गृहात नियुक्त असते त्यांच्याकडे पाठवतात. बालसुधार गृहात जेजे अॅक्ट 15 अन्वये 5 जणांची कमिटी असते. ही कमिटी आलेली सर्व कागदपत्रे, चार्जशीट पडताळते. संशयित अल्पवयीन मुलाच्या गुन्ह्यात क्रूरता असेल त्या खटल्याची जेजे अॅक्ट 18 अन्वये सुनावणी होते. दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या खटल्यामध्ये पोलिसांना परवानगी मिळाल्यानंतर बालसुधार गृहातच साध्या वेशात हा खटला चालवला जातो व चार ते पाच सुनावणीमध्ये त्याचा निकाल सुनावला जातो.
शहर पोलिस ठाण्यातील दप्तरी पोलिस राहूल घाडगे व श्रीनिवास देशमुख यांनी नटराज मंदिर खून प्रकरणातील कागदांची जंत्री बनवली आहे. ही जोडी पोलिस दलातील किचकट, गुंतागुंत गुन्ह्यातील कागदं बनवणारी यंग पण अनुभवी जोडी म्हणून ओळखली जात आहे. कायद्याचा अभ्यास करुन त्यांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलांचे चार्जशीट तयार करुन मंजुरी मिळवण्यासाठी पाठवण्याचा मानस पोनि भगवान निंबाळकर यांच्याकडे बोलून दाखवला. त्यानुसार पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याला परवानगी देवून प्रस्ताव बाल न्याय मंडळात पाठवण्यास सांगितले.
भारत देशामध्ये कायद्यानुसार 18 वर्षांखालील कोणाला अटक करण्यात येत नाही. गुन्ह्यात अशा मुलांना, मुलींना ताब्यात घेवून त्यांची सुधारगृहात रवानगी केली जाते. 2012 मध्ये दिल्ली येथे निर्भया घटनेत युवतीवर बलात्कार करुन तिला क्रूररित्या मारहाण करण्यात आल्याने संपूर्ण देश हादरला. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने त्यांनाही शिक्षा लागावी, अशी पहिल्यांदा जाहीर चर्चा होवून मागणी वाढू लागली. निर्भया घटनेतून देश सावरत असतानाच दुसर्या वर्षी 2013 मध्ये मुंबई येथील शक्ती मिल घटनेत महिलेवर जबरी बलात्कार झाला व संशयितांमध्ये अल्पवयीन मुले होती. यातून पुढे बाल कायद्यात अमुलाग्र बदल झाला व क्रूर घटनेत अल्पवयीन मुलांना शिक्षेची तरतुद करण्यात आली. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये अल्पवयीन मुलांना दंडात्मक शिक्षा झाली आहे. याशिवाय मध्यप्रदेश राज्यातील एका खटल्यात अल्पवयीन मुलांना शिक्षा देण्यात आली आहे.