पुणे : स्ट्रक्चरल ऑडिटसाठी रोबोट जाणार पाण्यात ; बारमाही पाण्यात असणार्‍या पुलांसाठी योजना | पुढारी

पुणे : स्ट्रक्चरल ऑडिटसाठी रोबोट जाणार पाण्यात ; बारमाही पाण्यात असणार्‍या पुलांसाठी योजना

समीर सय्यद : पुणे : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नद्यांमधील सतत पाण्याखाली असलेल्या पुलांच्या खांबांची झीज नेमकी किती झाली आहे, याची प्रत्यक्ष तपासणी करणे कठीण असते, त्यामुळे त्यांची दुरुस्ती योग्य प्रकारे होऊ शकत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी आता चक्क रोबोंची मदत घेण्यात येणार असून, हे रोबो खोल पाण्यात उतरून पुलांचे अचूक स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते आणि पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. त्यातून कमकुवत किंवा धोका निर्माण झालेले रस्ते आणि पुलांची दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळला जातो. परंतु, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नद्यांना येणारा पूर आणि वर्षाचे बारा महिने पुलाचे खांब पाण्यातच असतात. पाण्यातील रासायनिक घटकामुळे खांब खचने किंवा अन्य कारणांनी खांबाला इजा होत असते. परंतु, पाण्यामुळे खांबाचे स्ट्रक्चरल ऑडिट करता येत नाही. इंडियन रोड काँग्रेस या संस्थेचे 81 वे अधिवेशन उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत नुकतेच झाले. त्यात देश-विदेशातील अभियंत्यांनी संशोधनात्मक सादरीकरण केले. त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी बारा महिने पाण्याखाली असणार्‍या पुलांचे रोबोटच्या साह्याने ऑडिट करता येईल, याचे सादरीकरण केले.

असे होईल ऑडिट
रोबोट पाण्यामध्ये गेल्यानंतर 360 अंशांमध्ये पुलाच्या खांबाचे चित्रीकरण करेल. त्याच वेळी खांबाचे थेट चित्रीकरण स्क्रीनवर पाहता येईल. त्या वेळी ऑडिट करणारे तज्ज्ञ आणि अधिकारी त्या चित्रीकरणाची पाहणी करतील. त्यातून खांबाची सद्यस्थिती नोंदविण्यात येणार आहे.

 

पूल सतत पाण्यात असल्यामुळे पुलाच्या पायाखालील भागाची पाहणी करणे आवश्यक आहे. परंतु, पाण्यात उतरून पाहणी करणे जिकिरीचे आहे. नव्याने विकसित झालेल्या रोबोमुळे पुलाच्या खांबाची पाहणी करता येईल. नवतंत्रज्ञामुळे दोष लक्षात येत असल्यामुळे त्याची दुरुस्ती वेळेत करणे शक्य होणार आहे. तसेच पुलाचे आयुर्मानही वाढण्यास मदत होणार आहे.
    -अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग.

पावसाळ्यापूर्वी होते ‘स्ट्रक्चरल ऑडिट’
प्रशासनाच्या वतीने दर वर्षी पावसाळ्यापूर्वी पाटबंधारे विभागाला धरणांचे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाला पुलांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या सूचना दिल्या जातात. ऑडिट पूर्ण झाल्यानंतर दुरुस्ती आवश्यक असल्यास ती तत्काळ करून घेतली जाते. बाराही महिने पाण्यात असणार्‍या पुण्याच्या सुरक्षेविषयी शंका असायची. परंतु, आता त्या पुलांचेही ऑडिट केले जाणार आहे.

Back to top button