कराड : कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर रुग्णांवरील उपचारांसाठी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर दखल | पुढारी

कराड : कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर रुग्णांवरील उपचारांसाठी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर दखल

कराड; पुढारी वृत्तसेवा : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ संलग्न कृष्णा हॉस्पिटलने (Krishna Hospital) कॅन्सरग्रस्त रुग्णांवरील उपचारांसाठी दिलेल्या उत्तुंग योगदानाची दखल घेत, ‘युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी’ या संस्थेने कृष्णा अभिमत विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. पॅरिस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘इस्मो काँग्रेस २०२२’ या जागतिक परिषदेत पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. स्टेन कासा (नॉर्वे) व डॉ. गुड्रन क्रेए (ऑस्ट्रिया) यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.

(Krishna Hospital) जगभरातील १६० हून अधिक देशांमधील ऑन्कोलॉजिस्टची प्रमुख संस्था असलेल्या ‘युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी’ (इस्मो) च्यावतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा ९ ते १३ सप्टेंबर २०२२ दरम्यान पॅरिस येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत कॅन्सरवरील बदलती उपचारपद्धती, जगभरात त्याबाबत होत असलेले संशोधन, अशा विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यासाठी जगभरातून कॅन्सरवर उपचार करणाऱ्या संस्था व हजारो संशोधक उपस्थित होते.

कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये सन १९९८ मध्ये कर्करोग विभागाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजअखेर या विभागामार्फत ३५,००० हून अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या या विभागात कर्करोगावरील शस्त्रक्रिया, रेडिएशन, किमोथेरपी अशा सर्वच उपचार पद्धती उपलब्ध आहेत. रेडिएशन विभागात अत्याधुनिक ‘लिनिअर अॅंक्सिलरेटर’ मशिनद्वारे रूग्णांवर उपचार केले जातात. तसेच जगातील सर्व उच्च दर्जाच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये वापरले जाणाऱ्या व्हेरियन रेडिएशन थेरपी मशिनद्वारेही कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे. एन.ए.बी.एच. मान्यताप्राप्त असलेल्या या विभागात कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी सुरू करण्यात आलेले ‘पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक’ हे महाराष्ट्रातील ५ मान्यताप्राप्त संस्थांपैकी एक असून, पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच क्लिनिक आहे.

कृष्णा अभिमत विद्यापीठ संलग्न कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर उपचारासाठी दिलेल्या या योगदानाची दखल घेत, युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी या संस्थेच्यावतीने हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कृष्णा विद्यापीठाला प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाला युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजीची मान्यताप्राप्त संस्था म्हणून प्रमाणित करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उत्तरा भोसले, विनायक भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. रश्मी गुडूर उपस्थित होत्या. या जागतिक पातळीवरील पुरस्काराबद्दल डॉ. सुरेश भोसले यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Krishna Hospital : महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय विद्यापीठ

पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कृष्णा अभिमत विद्यापीठाला युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजीची मान्यताप्राप्त संस्था म्हणून प्रमाणित करण्यात आले. अशा प्रकारची मान्यता मिळविणारे कृष्णा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय विद्यापीठ असून, या मान्यतेमुळे युरोपीय राष्ट्रांतील मुलामुलींना आता कृष्णा विद्यापीठात येऊन आरोग्यसेवेचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button