सातारा : मुख्यमंत्र्यांच्या तापोळा विभागात ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू | पुढारी

सातारा : मुख्यमंत्र्यांच्या तापोळा विभागात ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यातील कोयना विभागातील तापोळा येथील १०८ ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन मास्क उपलब्ध न झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवसेनेचे दिवंगत माजी उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सपकाळ यांचे बंधू मारुती रामदेव सपकाळ यांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. तापोळा गावापासून हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे तांब हे गाव आहे.

दुर्गम, डोंगराळ तापोळा गावात १०८ ॲम्बुलन्समध्ये सुविधा व्यवस्थित नाहीत. ऑक्सिजनसह इतर सुविधा नसल्याने या परिसरातील रूग्णांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. तरीही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावाला भेट दिली होती. या ठिकाणी विशेष वैद्यकीय कक्ष देखील सुरू करण्यात आला आहे. मात्र, १०८ ॲम्बुलन्समधील सुविधांकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. याबाबत स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत वेळापूर गावचे सरपंच राम सपकाळ यासह तापोळा गावचे सरपंच आनंदात धनावडे यांनी संबंधितांना जाब विचारला. मात्र, त्या ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. भोंगळ कारभार आता मुख्यमंत्र्यांना स्वतः लक्ष घालून सुधारावा लागणार, अशी स्थिती या विभागात झाली आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button