Lumpy : राजधानीत ‘लंपी’ चा शिरकाव: देशभरात ५७ हजार जनावरांचा मृत्यू | पुढारी

Lumpy : राजधानीत 'लंपी' चा शिरकाव: देशभरात ५७ हजार जनावरांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील पशुपालन व्यवसायावर सध्या ‘लंपी’ (Lumpy) संसर्गजन्य रोगाचे ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि आजूबाजूच्या भागात धुमाकूळ घालणाऱ्या या आजाराने आता देशाची राजधानी दिल्लीतही थैमान घातले आहे. प्राप्त माहितीनुसार दिल्लीत लंपीग्रस्त १७३ जनावरे आढळली आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकाही प्राण्याच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

(Lumpy) खबरदारी म्हणून दिल्ली सरकारने ८२८७८४८५८६ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून संसर्ग रोखण्यासाठी जनावरांचे विलगीकरण वॉर्ड तयार केला आहे. गुरांना लस देण्यासाठी दिल्ली सरकार ‘गोट पॉक्स’ लसीचे ६० हजार डोस खरेदी करणार आहे. दिल्लीतील पशुपालकांना या लसी मोफत दिल्या जाणार आहेत. रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्यांना गुरांची लसीकरण मोहीम अधिक तीव्रतेने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. लंपीचा प्रादुर्भाव लक्षात घेता ६ ते ७ राज्यांमध्ये त्याचा अधिक प्रभाव आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार हा आजार गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात पसरला आहे.

Lumpy : लंपीमुळे ५७ हजारांहून अधिक गुरांचा मृत्यू

या आजारामुळे देशभरात ५७ हजारांहून अधिक गुरांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये २,१०० हून अधिक गुरांना या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मध्य प्रदेश सरकारने राज्याच्या बाधित भागात गोवंश जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.

राजस्थानात लंपीचे सर्वाधिक बळी

केंद्र सरकारने केंद्रीय स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, ज्यातून राज्यांना सल्ला आणि मदत दिली जातोय. राजस्थानमध्ये या आजारामुळे सर्वाधिक ३७ हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारकडून या आजाराबाबत राज्यांना सातत्याने सूचना पाठवण्यात येत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button