पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वत: च्या अडीच महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका क्रुर आईला पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील झुंझुनू गावातील आहे. बालरुग्णालयातील सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला. तसेच अडीच महिन्याची मुलगीही सुखरूप बचावली.
याबाबतची माहिती अशी की, राजस्थान येथील झुंझुनू बुहानाच्या सांगा गावात सुमन (२४ वर्ष) आणि सोनू यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. यानंतर सुमनने १६ जून २०२२ रोजी एका मुलीला जन्म दिला. हे त्याचे पहिले अपत्य आहे. सुमनची अडीच महिन्यांची मुलगी श्रेया हिला श्वास घेण्यास त्रास होवू लागला. तिला नारनौल शहरातील बालरुग्णालयात दाखल करण्यात आले.
२ सप्टेंबरपासून सुमन आपल्या मुलीच्या देखरेखीसाठी रुग्णालयात होती. १० सप्टेंबर रोजी मुलगीच्या प्रकृतीत सुधारणा होवून ती बरी होवू लागली. याच दरम्यान सुमनला मुलीला दूध पाजण्यास सांगितले गेले. मात्र, यानंतर थोड्याच वेळात पुन्हा मुलगीची तब्येत खालवली. यानंतर सुमनच्या सासूने डॉक्टरांना बोलावल्यावर मुलगी श्रेयाच्या हृदयाचे ठोके पुन्हा कमी-कमी होत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व प्रकारांमुळे लगेचच कसे काय असे होवू शकते? अशी शंका तेथील डॉक्टरांना आली.
यानंतर डॉक्टरांनी रूग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेच तपासले. यानंतर सुमनच्या क्रुरतेची माहिती समोर आली. यात सुमनने स्वत: च तिच्या अडीच महिन्याच्या मुलीचा गळा दाबत असल्याचे उघडकीस आले. डॉक्टरांनी य़ा घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. मुलगी नको असल्याने तिने हा प्रकार केल्याचेदेखील उघडकीस आले आहे.
नारनौल महावीर पाेलीस ठाण्याचे अधिकारी राजबाला यांनी सांगितले की, एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी फोन करून एका महिलेने तिच्या बाळाचा गळा दाबण्याचा पर्यत्न केला असल्याची माहिती दिली. पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. सीसीटीव्ही फुटेच तपासले गेले. संबंधित महिला मुलीचा गळा दाबताना स्पष्टपणे दिसत होती. तिला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या आजारपणाला कंटाळून हे कृत्य केल्याचे महिलेने पाेलिसांनी सांगितले.
हेही वाचलंत का?