उंडाळे; पुढारी वृत्तसेवा : पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या भावाला संपविल्याची धक्कादायक घटना उंडाळे (ता. कराड) येथे घडली. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. सचिन वसंत मंडले (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अवधूत हनुमंत मदने (वय 42, रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा, सांगली) याला कराड तालुका पोलिसांनी इस्लामपूर येथून अटक केली आहे.
सचिन मंडले हा मूळचा रेठरे खुर्द येथील रहिवासी असून तो मागील दोन वर्षांपासून उंडाळे येथे स्थायिक झाला आहे. उंडाळेसह परिसरात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या सचिन मंडले याच्या बहिणीचा विवाह सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष येथील अवधूत मदने याच्याशी झाला होता. शुक्रवारी रात्री अवधूत हा सचिनच्या उंडाळे येथील घरी आला होता. उंडाळे येथील घरी सर्वांनी एकत्रित जेवण केले आणि त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सचिन अवधूत याला सोडण्यासाठी घराबाहेर गेला. यावेळी अवधूत याने धारदार सुरा सचिनच्या पोटात खुपसला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सचिनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून पोबारा केलेल्या संशयित अवधूत याला रात्री उशिरा इस्लामपूर येथे जेरबंद करण्यात कराड तालुका पोलिसांना यश आले.
हेही वाचा :