सातारा जिल्हा परिषद : निधीसाठी सदस्य झिजवताहेत झेडपीचे उंबरे | पुढारी

सातारा जिल्हा परिषद : निधीसाठी सदस्य झिजवताहेत झेडपीचे उंबरे

सातारा ; प्रवीण शिंगटे : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणूक सन 2022 मध्ये होत आहे. त्याची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषद सदस्यांच्या फेर्‍या मिनीमंत्रालयात वाढू लागल्या आहेत. जो-तो सदस्य आपल्या गटात जास्तीत जास्त विकास कामे कशी करता येतील, त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. अनेक सदस्य सकाळपासूनच झेडपीच्या विविध विभागांत तळ ठोकून असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुका 5 ते 6 महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे सन 2022 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये 64 गट असून 128 पंचायत समिती गण आहेत.

त्यामुळे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या सदस्यांची विकासकामांच्या निधीसाठी व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.

कोरोनावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने पावले उचलली. विविध विकास कामांवरील निधी शासनाने आरोग्य विभागाकडे वळवला. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्यांच्या विकास कामांना खीळ बसली आहे.

अनेक सदस्यांना गटामध्ये बोटावर मोजण्याइतकीच कामे करता आली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कामे जिल्हा परिषद गटात व्हावीत, अशी मानसिकता सदस्यांची आहे.

मात्र, पुन्हा तिसर्‍या लाटेचा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तवला आहे. त्यामुळे विविध विभागांचा निधी पुन्हा आरोग्याकडे वळवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या गटात विविध विभागांतून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

बहुतांश सदस्य दररोज सकाळी विविध कामांची लेटर पॅड घेवून जिल्हा परिषदेमध्ये हजेरी लावत आहेत.

जि. प. सदस्यांच्या दररोज उठाबशा वाढल्या

ग्रामपंचायत विभाग, बांधकाम विभाग उत्तर व दक्षिण, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघु पाटबंधारे विभाग, समाजकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, पाणी व स्वच्छता विभाग, कृषी विभागासह अन्य विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे जि. प. सदस्यांच्या दररोज उठाबशा वाढल्या आहेत.

सदस्य अधिकार्‍यांना काय काय कामे घेता येतील याची माहिती विचारुन घेत आहेत. तसेच विविध कामांच्या नावाचे प्रस्ताव संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांकडे देण्यात येत आहेत.

तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींकडेही कामासंदर्भात सदस्यांच्या भेटी होत आहेत.

त्यामुळे अनेकांची पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त विकासकामे जिल्हा परिषद गटात होण्यासाठीच धडपड सुरु आहे.

जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होणार आहेत.

त्यामुळे या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विकासकामांना मर्यादा येणार आहेत.

आचारसंहिता लागण्यापूर्वीच विकासकामांना मंजुरी घेवून ही कामे लवकरात लवकर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची धडपड सुरु आहे.

गटागटांत विकास कामांचा उडणार धुरळा

जिल्हा परिषदेच्या पुरवणी अंदाजपत्रकात विविध विभागांतील योजनांना मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे.

यामुळे सदस्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. त्यामुळे गटागटांमध्ये विकासकामांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.

Back to top button