सातारा : हुल्‍लडबाज पर्यटकांवर पोलिसांचा वॉच ; कास, ठोसेघर मार्गावर चेकपोस्ट अन् पेट्रोलिंग | पुढारी

सातारा : हुल्‍लडबाज पर्यटकांवर पोलिसांचा वॉच ; कास, ठोसेघर मार्गावर चेकपोस्ट अन् पेट्रोलिंग

 पुढारी वृत्तसेवा वर्षा पर्यटन अन् कास, ठोसेघरचा नयनरम्य निसर्ग हे समीकरण आता सर्वदूर पोहचले आहे. मात्र, या पर्यटनाला कित्येकदा बेशिस्त पर्यटकांच्या हुल्लडबाजीचे गालबोट लागते. या हुल्‍लडबाजांवर आता पोलिसांचा वॉच राहणार आहे. कास व ठोसेघर मार्गावर चेकपोस्ट उभारले जाणार असून पेट्रोलिंगही होणार आहे.

कासचे निसर्ग पठार अन् ठोसेघरचा धबधबा ही सातारा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. गेल्या काही वर्षांत ती जगाच्या नकाशावर पोहचली आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या स्थळांना भेटी देतात. खासकरुन पाऊसधारा बरसायला लागल्या की पर्यटकांची पावले कास, ठोसेघरच्या दिशेकडे वळतात. मात्र, या पर्यटनस्थळांना बेशिस्त पर्यटकांच्या वर्तनाने गालबोट लागल्याच्या कित्येक घटना घडल्या आहेत. पर्यटकांची हुल्लडबाजी ही देखील वेळोवेळी चिंतेचा विषय ठरली आहे. विशेषतः परिसरातील स्थानिक रहिवाशांना अशा पर्यटकांचा उपद्रव सहन करावा लागतो. या भागातील गुराखी, महिला, तरुणींना त्याची झळ बसत असते.

या पार्श्‍वभूमीवर राजापुरी, ता. सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोरे यांनी अशा बेताल पर्यटकांच्या वर्तनावर आळा बसवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मोरे यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर याविषयी तक्रार केली होती. तसेच मुख्य हंगामात कास, ठोसेघर या दोन्ही मार्गांवर पोलिस चेकपोस्ट तसेच फिरत्या बंदोबस्ताच्या मागणीचे निवेदन सातारा तालुका पोलिस ठाण्याला दिले होते. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना दोन्ही मार्गांवर पोलिस चेकपोस्ट आणि पेट्रोलिंग सुरु करण्यात येणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे. त्यासाठी ‘फिक्स पॉईंट बीट मार्शल’ नेमले जाणार आहेत.

बेशिस्त, बेताल पर्यटकांचा परिसरातील स्थानिकांना अनेकदा उपद्रव सहन करावा लागला आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने त्याची वेळीच दखल घेतली आहे.
– प्रशांत मोरे, राजापुरी

हेही वाचा

Back to top button