सोलापूर : विद्यार्थी संघटनेच्या मागण्या मान्य | पुढारी

सोलापूर : विद्यार्थी संघटनेच्या मागण्या मान्य

सोलापूर;  पुढारी वृत्तसेवा :  विद्यार्थ्यांच्या विविध संघटना एकत्र येऊन विद्यापीठाविरोधात प्रचंड गोंधळ करुन मागण्या मान्य करून घेतल्या. विशेष बाब म्हणून या सर्वात मुख्यमंत्र्यांनी कुलगुरूंना फोन करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे तत्काळ निवारण करावे, अशी सूचनाही देण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने परीक्षासंदर्भातील जाचक अटी रद्द करून नवे परिपत्रक जाहीर केले आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाकडून 6 जुलै रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये काही जाचक अटी व नियम घालण्यात आले होते. यामध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता प्रश्‍नपत्रिकेमध्ये बहुपर्यायी ओएमआर ऑफलाईन पद्धत राबवण्यात आली असल्याचा निषेध व्यक्त करत सोलापूर शहर-जिल्हा विद्यार्थी संघर्ष समितीच्यावतीने सोमवार, 11 जुलै रोजी विद्यापीठासमोर आंदोलन करण्यात आले होते.

6 जुलै परिपत्रकामधील जाचक अटी

  • विद्यापीठाच्या प्रश्‍नपत्रिकेचे संच ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’, ‘एफ’ या स्वरूपात.
  • ओएमआर शीट भरणे, प्राथमिक माहिती भरणे अनिवार्य, यामध्ये चुका झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा शीट मिळणार नाही.
  • परीक्षेसाठी 50 प्रश्‍न सोडवणे अनिवार्य, प्रत्येक प्रशनाला एक गुण, 60 मिनिटांचा कालावधी.
  • परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरसूची मिळणार नाही.
  • उत्तरपत्रिका ओएमआर संगणकाद्वारे तपासण्यात येणार असल्यामुळे फोटोकॉपी दिली जाणार नाही.
  •  पुनर्मूल्यांकन केले जाणार नाही.

12 जुलै रोजी दुरुस्ती केलेले परिपत्रक

  • ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’, ‘एफ’ या स्वरुपातील परीक्षा पद्धती रद्द करण्यात आले.
  • ओएमआर शीट भरण्यासाठी 15 मिनिटे आधी वाढीव वेळ देण्यात आली.
  • 60 मिनिटांचा वेळ वाढवून 75 मिनिटे देण्यात आला.
  • परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका मिळणार.
  • परीक्षा संपल्यानंतर विद्यापीठाच्या संकेत स्थळावर एक आठवड्यात सूची उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन परिपत्रकात बदल केल्यामुळे विद्यापीठ प्रशासन व कुलगुरूंचे तसेच मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद.
– केशव इंगळे, सोलापूर विद्यार्थी संघर्ष समिती

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाकडून परिपत्रकामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भातील अधिकच्या माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. विद्यार्थ्यांनी तणावमुक्‍त होऊन परीक्षेला सामोरे जावे.
– डॉ. शिवकुमार गणपुरे
संचालक, परीक्षा मूल्यमापन मंडळ

Back to top button