शिरवळ बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य ; गैरसोयींमुळे प्रवाशांचे हाल : अधिकार्‍यांची गांधारीची भूमिका | पुढारी

शिरवळ बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य ; गैरसोयींमुळे प्रवाशांचे हाल : अधिकार्‍यांची गांधारीची भूमिका

नायगाव : पुढारी वृत्तसेवा खंडाळा तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे शिरवळ येथे बसस्थानक परिसरात सर्वत्र राडारोडा झाला असून, बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच बंदिस्त गटारांचे झालेले अधर्वट काम आणि बंद असलेले स्वच्छतागृह यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व महिलांचे हाल होत आहे.

शिरवळ हे पंचक्रोशीतील चाकरमान्यांचे, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाचे प्रवासाचे महत्त्वाचे बसस्थानक आहे. परंतु विविध गैरसोयींचा बसस्थानकाला विळखा बसला आहे. काही दिवसांपासून खंडाळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक बसस्थानकांमध्ये चिखलाचे साम्राज्य झाले आहे. पुणे बाजूकडून येणार्‍या बाजूस पावसामुळे चिखल पाण्याची डबकी तयार झाली आहेत. बसेस ये-जा करतेवेळी प्रवाशांच्या व शालेय विद्यार्थ्यांचा कपड्यांवर चिखल व डबक्यातील पाणी उडत आहे. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी महामार्ग प्रशासनाने शिरवळ येथील महामार्ग आणि सर्व्हिस रस्त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी बसस्थानक परिसरात बंदिस्त गटारासाठी चारी खणली होती. काम झाल्यानंतर चारी बुजवण्यात आली. परंतु, यानंतर येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. महामार्ग प्रशासनाने हे काम अर्धवटच केल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे. तसेच बसस्थानकमधील या ना त्या अशा विविध समस्यांवर संबंधित अधिकारी वर्ग डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.

लांब पल्ल्याच्या बहुतांश बसेस शिरवळ बसस्थानकात न येता त्या महामार्गावरून सरळ पुढे जात असल्याचे प्रवासी वर्गाची तक्रार आहे. तसेच येथील स्वच्छतागृहात काही महिन्यांपूर्वी खून झाला होता तेव्हापासून ते स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही हे स्वच्छतागृह अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. चिखलाचे साम्राज्य असतानाच अस्वच्छतेमुळे बसस्थानक परिसर बकाल होऊ लागला आहे.

हेही वाचा

Back to top button