सातारा : गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी गेलेल्या ट्रेकर्सच्या बसला मनालीत अपघात, ७ जण जखमी | पुढारी

सातारा : गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी गेलेल्या ट्रेकर्सच्या बसला मनालीत अपघात, ७ जण जखमी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मनाली येथे गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी गेलेल्या ट्रेकर्सच्या बसला अपघात झाला आहे. प्रशिक्षण पूर्ण करून साताराकडे परतत असताना सोमवारी (दि. ६) रोजी पहाटे ही घटना घडली. या अपघातामध्ये सहा ते सात जण जखमी झाले आहेत.

सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्यावतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गिर्यारोहण व स्कुबा डायव्हिंग हे दोन उपक्रम राबविण्यात येत होते. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर केला आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण सिंधुदुर्ग येथे प्रशिक्षणार्थींना एका खासगी संस्थेमार्फत देण्यात आले. त्यानंतर वाई व महाबळेश्वर तालुक्यात गिर्यारोहणाचे प्रशिक्षण एका खासगी संस्थेमार्फत देण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २६ दिवसाच्या प्रशिक्षणासाठी ५० जणांना बेसिक मौंटेनीरिंग कोर्ससाठी मनाली येथे पाठवण्यात आले होते.

हे सर्व जण दि. ८ मे रोजी मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. २६ दिवसांचा प्रशिक्षण कालावधी शासनाच्या गिर्यारोहण इन्स्टिट्यूटमध्ये पार पडल्यानंतर हे सर्वजण सोमवारी पहाटे साताराकडे परतत होते. पहाटे पाचच्या सुमारास मंडी येथे ट्रॅव्हल बस आणि आणकी एका बसची समोरासमोर धडक झाली. यानंतर बसमधील सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता सर्व प्रशिक्षणार्थी सुखरूप असून त्यांना साताऱ्याकडे आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यातील एक जण जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. तोही सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

या सर्वांची नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनला राहण्याची सोय करण्यात आली असून उद्या रेल्वेने हे सर्वजण साताराकडे रवाना होणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमाळे यांनी दिली. दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे तेथील प्रशासनाशी संपर्क साधत आहेत. प्रशिक्षणासाठी गेलेले सर्वजण सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button