निकाल : ‘माझी वसुंधरा’ अभियानात कराड नगरपालिका राज्यात प्रथम | पुढारी

निकाल : 'माझी वसुंधरा' अभियानात कराड नगरपालिका राज्यात प्रथम

कराड ; पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत आयोजित स्पर्धेत कराड नगरपालिकेने सलग दुसऱ्यावर्षी सर्वोत्तम कामगिरी केली. रविवारी या स्पर्धेचा निकाल मुंबईत जाहीर झाला. यात राज्यातील नगरपरिषद गटात कराड नगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावत सुमारे 5 कोटींचे बक्षीस पटकावले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, रोकडे, मुझफ्फर नदाफ, सुरेशं शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत “माझी वसुंधरा” हे पर्यावरण रक्षण व संवर्धनसाठीचे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायती यांनी या अभियानात सहभाग नोंदवला होता. पर्यावरण रक्षण व संवर्धन संदर्भात केलेल्या कामगिरीच्या आधारे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत गतवर्षी कराड नगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. यावर्षी आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करत, नगरपालिकेने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कराड पालिकेत कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.

हेही वाचा :

Back to top button