फाशीचा वड हुतात्मा स्मारक विकसित करण्याचे आव्हान

हुतात्म्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या या स्तंभाची पाठीमागच्या बाजूने दूरवस्था झाली आहे.  दुसऱ्या छायाचित्रात शाहुपूरीतील फाशीचा वड स्मारकारची अशी दुरवस्था झाली असून वडाचा पारही भेगाळला आहे.
हुतात्म्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून उभारलेल्या या स्तंभाची पाठीमागच्या बाजूने दूरवस्था झाली आहे. दुसऱ्या छायाचित्रात शाहुपूरीतील फाशीचा वड स्मारकारची अशी दुरवस्था झाली असून वडाचा पारही भेगाळला आहे.

सातारा : विशाल गुजर

शाहूपुरी परिसरातील ऐतिहासिक फाशीचा वड या हुतात्मा स्मारकाची महती आणखी सर्वदूर पोहचवण्याची गरज आहे. या स्मारकाचा नव्याने विकास करण्याचे आव्हान असून त्याचे पावित्र्य जपण्याची इतिहासप्रेमींकडून मागणी होत आहे. सध्या दुर्लक्षामुळे या स्मारक परिसराला अवकळा आली आहे.

सातार्‍यात गेंडामाळ या ठिकाणी 1857 च्या बंडात उठाव करणार्‍या 17 जणांना हौतात्म्य प्राप्‍त झाले होते. पालिकेने या शहीदांचे शाहुपूरी येथे फाशीचा वड येथे 2001 साली हुतात्मा स्मारक उभारले.

सध्या हे स्मारक दुर्लक्षित झाले असून येथील स्वच्छता अथवा तत्सम दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. ज्या वडाला क्रांतीकारकांना फाशी देण्यात आली होती तो वड काही वर्षांपूर्वी नष्ट झाला. त्याजागी दुसर्‍या वडाच्या फांदीचे रोपण करुन वडाचे झाड वाढवण्यात आले आहे. मात्र, सध्या हे झाड ज्या जागेत आहे त्यानजीक विजेचा खांब असल्याने या झाडाच्या फांद्या वारंवार तोडाव्या लागत आहेत. त्यामुळे या वडाची वाढही खुंटली आहे.

स्मारकात उजेडासाठी उभारण्यात आलेल्या शोभेच्या विजेच्या खांबांवर परिसरात वाढलेल्या वेलींनी विळखा घातला आहे. समाजकंटकांनी दोन खांबांवरील बल्ब फोडून विद्रुपीकरण केले आहे. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ते सध्या बंद अवस्थेत आहेत. स्मारकात नागरिकांना बसण्यासाठी सात-आठ सिमेंटची बाकडी बसवण्यात आली आहेत. त्यातील बहुतांशी बाकडी जुनी झाल्याने तुटण्याच्या मार्गावर आहेत. स्मारकाला असलेल्या लोखंडी दरवाजासमोरच कॉलनीतील कचरा टाकला जात असल्याने याठिकाणी कचर्‍याचा मोठा ढीग तयार झाला आहे.

वडाचा पार भेगाळला

या स्मारकाचा मुख्य भाग असलेल्या फाशीच्या वडाच्या झाडाभोवती सिमेंटचा पार बांधण्यात आला आहे. वडाची मुळे व पारंब्यामुळे या पाराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्याचा काही भाग ढासळण्याच्या मार्गावर आहे. या पाराची तातडीने दुरुस्ती होण्याची गरज आहे. गेल्या कित्येक दिवसात या पाराचीही स्वच्छता न झाल्याने पाराभोवती गवताची दाटी झाली आहे.

सातार्‍यातील बंडानंतर देशात क्रांतीची मशाल

ब्रिटीशांनी दिलेल्या शिक्षेची 8 सप्टेंबर 1858 रोजी अंमलबजावणी झाली. इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे 17 क्रांतिवीरांना प्राणास मुकावे लागले तीच ही होताम्यभूमी फाशीचा वड म्हणून ओळखली जात आहे. त्या ठिकाणी आज तो ऐतिहासिक फाशीचा वड नाही; पण येणार्‍या पिढ्यानपिढ्यांना तो प्रेरणा देईल, असा हुतात्मा स्तंभ आहे. 1857 चे हे बंड म्हणजे भारतीय स्वातंत्रलढ्यातील एक महत्त्वाचे पर्व आहे. या बंडानंतरच देशात क्रांतीची मशाल पेटली.

यांनी पत्करले हौतात्म्य…

नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी (वाकनीस), सीताराम गुप्ते या क्रांतीकारकांना फाशी तर मुनजी भांदिगें, सखाराम शेट्ये, बाब्या गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी या क्रांतीकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाब्या कानगी रामोशी, नाम्या रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे) पर्वती पोटाले (पाटोळे), पतालू येशू या क्रांतीकारकांना गोळ्या घालण्यात आल्या. या क्रांतीकारकांचा नामोल्लेख छत्रपती शिवाजी संग्रहालयातील नोंदीमध्ये आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news