सातारा : अपघातात सख्खे चुलत भाऊ ठार | पुढारी

सातारा : अपघातात सख्खे चुलत भाऊ ठार

दहिवडी (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
गोंदवले खुर्द येथे दोन दुचाकी व स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पानवण ता. माण येथील दोन सख्खे चुलत भाऊ ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर पल्सरने पेट घेतला तर स्विफ्ट कार तीस फूट लांब एका रानात जाऊन पलटी झाली.

अजित शंकर नरळे (वय 18) व त्याचा चुलत भाऊ उमाजी आप्पा नरळे (वय 22, दोघे रा. पानवण ता. माण), अशी अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. तर नामदेव नागु वीरकर (वय 45 रा. जांभुळणी ता. माण) हे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अजित व उमाजी हे मंगळवारी सकाळी पुण्यातून पल्सर (नंबर माहीत नाही) तर दुसरी दुचाकी (एम एच 11 सीके 8043) तर एक स्विफ्ट कार (क्र. एम एच 14 जी एच 4458) ही कार महेंद्र ज्ञानू वाघमारे दिघंची आटपाडी येथील असून त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा आशिष महेंद्र वाघमारे हे पुण्याला निघाले होते.

गोंदवले खुर्द येथे मुख्य रस्त्यावरून जाताना मेजर हॉटेल समोर दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारने धकड दिल्याने पल्सर गाडी एका रानात जाऊन पडली व त्या गाडीने पेट घेतला. तर पल्सर वरील उमाजी नरळे हा नेपाळ येथे सोन्या चांदीच्या दुकानात काम करतो तो जागीच ठार झाला. तसेच त्याचा चुलत भाऊ अजित नरळे हा कराडला उपचारासाठी नेहताना ठार झाला. तर नामदेव वीरकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सातारा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच दहिवडी पोलिस ठाण्यातील वाहतूक पोलिस केतन बर्गे, गजानन वाघमारे व राऊत यांनी तत्काळ रोड वरील गर्दी हटवून रस्ता खुला केला. या अपघाताची दहिवडी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून सपोनि संतोष तासगावकर तपास करत आहेत.

दरम्यान, अजित नरळे हा आई वडिलांना एकुलता एक असून उमाजी याला एक भाऊ आणि चार बहिणी आहेत. दोघांच्याही घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून आई-वडील ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. ऊसतोडणीचे काम संपवून ते नुसकतेच घरी आले होते. कुटुंबाला आधार देण्यासाठी अजित हा पुण्यात एका कंपनीत काम करतो. तर उमाजी हा गेल्या दीड वर्षांपासून नेपाळमध्ये सोन्या चांदीच्या दुकानात काम करत होता. दीड वर्षांनंतर तो यात्रेनिमित्त गावी येत होता. परंतु गावी पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघाताने पानवण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button