नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री होण्याबरोबरच मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे 'टीका' माझ्यासाठी नित्याचीच आहे. टीकेशिवाय मला झोप लागत नाही. काही लोकांना झोप लागावी म्हणून गोळी घ्यावी लागते, परंतु मला टीकेचा व्हिडिओ बघितल्याशिवाय झोप लागत नाही, असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता राणे कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली.
सपकाळ नॉलेज हब येथे आयोजित केलेल्या करिअर कट्टा बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सपकाळ नॉलेज हबचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांनी प्रास्ताविक करताना सीईटी विभागात चारशे ते पाचशे कोटी रुपये पडून आहेत. तो निधी चांगल्या शैक्षणिक संस्थांना न देता डिपॉझिट कुठे ठेवावे यासाठी वाद सुरू आहे. ही एक प्रकारे चिंधीचोरी आहे. त्याचबरोबर परीक्षा विभागातही प्रचंड गोंधळ आहे. त्यात सुसूत्रता आणावी अशा प्रकारची मागणी केली.
'मी किती संकटांवर मात केली'
दोन, अडीच वर्षांपूर्वी असा गोंधळ असेल, मात्र आता तशी परिस्थिती नाही. तुम्हाला असे वाटत असेल की, सीईटी विभागाबाबत मंत्री काय करतील. तर मी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असण्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्रीही आहे. त्यामुळे मी किती संकटांवर मात केली असेल याची कल्पना करा. मला यापेक्षाही भयानक टीका ऐकण्याची सवय आहे. काही लोकांना झोपण्यासाठी डिस्प्रिन घ्यावी लागते. मला मात्र टीकेशिवाय झोप लागत नाही. टीकेचा जेव्हा व्हिडिओ बघतो, तेव्हा मला झोप लागते, असे म्हणत ना. सामंत यांनी नाव न घेता राणे कुटुंबावर निशाणा साधला.