सातारा : विद्यार्थी मंडळांच्या निवडणुका यंदाही लटकलेल्याच | पुढारी

सातारा : विद्यार्थी मंडळांच्या निवडणुका यंदाही लटकलेल्याच

सातारा : मीना शिंदे
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातील दुवा असलेल्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका म्हणजे भविष्यकालीन प्रतिनिधित्वाची रंगीत तालीमच असते. मात्र, मागील काही वर्षांपासून या निवडणुकाच झाल्या नाहीत. सध्या ऑफलाईन शैक्षणिक कामकाजातील दुसरे सत्र सुरु झाले तरी विद्यापीठाकडून विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याने विद्यापीठ प्रतिनिधी निवडी लटकल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

तब्बल दोन वर्षानंतर शैक्षणिक कामकाज ऑफलाईन सुरू झाले आहे. कोरोनामुळे महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्षांचे नियोजन पुढे गेले आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या पहिल्या सत्राचे कामकाजही पुढे गेले आहे. सध्या दुसरे सत्र सुरू झाले असून शैक्षणिक कामकाजामध्ये नियमितता आली आहे. महाविद्यालयांच्या वार्षिक नियोजनानुसार दुसर्‍या सत्रातील विविध उपक्रमांनाही सुरुवात झाली आहे. महाविद्यालय व्यवस्थापन, विद्यापीठ व विद्यार्थी यांच्यामधील दुवा म्हणून वर्ग प्रतिनिधी, विद्यापीठ प्रतिनिधी काम पाहत असतात. त्यामुळे हे प्रतिनिधी विद्यार्थ्यांमधून आणि विद्यार्थ्यांच्या मताने ठरवले जाणे गरजेचे असते. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया महाविद्यालयांमध्ये राबवली जायची. या निवडणुका म्हणजे तरुण नेतृत्व तयार करण्याची फॅक्टरीच होती. आमदार – खासदारकीच्या निवडणुकांसारखी रंगत आणि चुरस असायची त्यात. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्यांचा मुक्‍त वापर व्हायचा. या निवडणुकांना आचारसंहितेची चौकट नव्हती. तरुण, सळसळत्या रक्ताचं ते युद्ध असायचं.

भविष्यातील राजकीय करिअरची रंगीत तालीम किंवा पायाभरणीच असायची. राजकीय नेतेही या कॉलेज-विद्यापीठ निवडणुकीत खूप रस घ्यायचे. घडलेल्या काही अप्रिय घटनांमुळे काही वर्षांपूर्वी या निवडणुका बंद झाल्या. विद्यार्थी मंडळाचे प्रतिनिधी गुणवत्तेवर आधारित निवडले जात आहेत. परंतु, मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन वर्गाच्या गोंधळात विद्यार्थी मंडळाच्या निवडीच झालेल्या नाहीत. सध्या ऑफलाईन शिक्षण सुरू असतानाही नवीन शैक्षणिक वर्षात या निवडींबाबत अद्याप विद्यापीठाकडून महाविद्यालयांना कोणत्याही सूचनाच आलेल्या नाहीत. शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्रातच विद्यार्थी निवडी होणे अपेक्षित असताना दुसरे सत्र सुरू होऊनही विद्यार्थी मंडळाच्या निवडी कागदपत्रांच्या आदेशात लटकल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.

तब्बल तीन दशके इलेक्शनपासून दूरच…

1991 मध्ये मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये ओवन डिसूझा या काँग्रेस कार्यकर्त्याचा खून झाला. त्या खुनाचा संबंध विद्यार्थी राजकारणाशी जोडला गेल्याने सर्व विद्यापीठांमधील विद्यार्थी मंडळे व प्रतिनिधी निवडणुका बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे 1992 पासून तब्बल 30 वर्षे राज्यातील विद्यार्थी महाविद्यालयीन इलेक्शनपासून दूर आहेत. या काळातील कॉलेजवीरांना कॉलेजबाहेर पडल्यावर थेट इलेक्शन ट्रेनिंग मिळत आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button