नोंदवहीत खाडाखोड करून कैद्यांना ठेवले तुरुंगाबाहेर ; नाशिकरोड कारागृहातील प्रकार | पुढारी

नोंदवहीत खाडाखोड करून कैद्यांना ठेवले तुरुंगाबाहेर ; नाशिकरोड कारागृहातील प्रकार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना संचित रजेवर सोडल्यानंतर मुदतीत त्यांना कारागृहात न घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींच्या न्यायालयीन दिवसांत वाढ करून कारागृहातील शासकीय अभिलेखात खाडाखोड करून तारखा बदलवून आरोपींना कारागृहाबाहेर बेकायदेशीरपणे मुक्त केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तत्कालीन दोन तुरुंग अधिकार्‍यांसह एका वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तत्कालीन श्रेणी एकचे तुरुंग अधिकारी श्यामराव आश्रुबा गिते, श्रेणी दोनचे तत्कालीन तुरुंग अधिकारी माधव कामाजी खैरगे व तत्कालीन वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डाबेराव अशी या तिघा संशयित अधिकार्‍यांची नावे आहेत. या तिघांनी मिळून कारागृहातील नोंदवहीमध्ये खाडाखोड करून तसेच व्हाइटनर लावून शिक्षा वॉरंट न्यायाधीन कालावधी, माफीचे दिवस, बायो दिवस कालावधी या नोंदवहीवर खाडाखोड करीत शिक्षाबंदी कैद्यांना बेकायदेशीरपणे मुक्त केले होते. फिर्यादीनुसार राजलिंगम गुंटुका याला 14 दिवसांची संचित रजा मंजूर असताना 409 दिवस तो फरार होता. पोलिसांनी नाशिकरोड कारागृहात
त्यास हजर केले, मात्र नोंदवही मध्ये केवळ 44 दिवस उशिराने आल्याचे दाखविण्यात आले. व्यंकट रामलू व्यंकटया या कैद्याला रजेवर सोडण्यात आले. मात्र, हा नियत कालावधीत हजर न होता तीन हजार 345 दिवस उशिराने हजर झाला. मात्र नोंदवहीमध्ये खाडाखोड करून दोन हजार 706 दिवस दाखविण्यात आले.

विलास बाबू शिर्के या कैद्याच्या माफीच्या दिवसांची नोंद एक हजार 407 असताना खाडाखोड करून दोन हजार 127 दिवसांची करून त्यास कारागृहातून मुक्त करण्यात आल्याचे तपासात समोर आले. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता मागील काही दिवसांचे रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. हा प्रकार उघडकीस येताच नाशिकरोड पोलिस ठाण्यात कारागृह अधिकारी सतीश गायकवाड यांनी तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button