सातारा : लालपरी गावागावात पुन्हा सुसाट | पुढारी

सातारा : लालपरी गावागावात पुन्हा सुसाट

सातारा : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संपामुळे गेले साडेपाच महिने आगारात थांबलेली एसटी आता गावागावात सुसाट धावू लागली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील एसटीची सेवा पूर्ववत सुरु झाली आहे. बुधवारअखेर सातारा विभागात सुमारे 2 हजार 201 कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह लांबपल्ल्याच्या दैनंदिन फेर्‍यांमध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी नोव्हेंबरपासून संप पुकारला होता. संपामुळे ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक थांबली होती. त्यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गांचे हाल झाले होते. उन्हाळी सुट्टीत पर्यटन स्थळ व गावाकडे कसे जायचा असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. 22 एप्रिलपर्यंत एसटी कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचारी कामावर हजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, मेढा, फलटण, पारगाव-खंडाळा, वडूज, दहिवडी, कोरेगाव आगारातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. लांब पल्ल्यासह शटल व ग्रामीण फेर्‍या विविध आगारामार्फत पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावागावामध्ये लालपरी सुसाट धावू लागल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी पुन्हा त्याच जोशात वेगात विविध मार्गावर धावताना दिसत आहे. मंगळवारी सर्व आगारातील सुमारे 1 हजार 334 फेर्‍यांमधून 1 लाख 28 हजार 169 प्रवाशांनी प्रवास केला. बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 हजार 137 फेर्‍यांमधून 1 लाख 12 हजार 730 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली. दरम्यान, बुधवारअखेर सातारा विभागात चालक 629, कंत्राटी चालक 58, वाहक 679, चालक कम वाहक 116, यांत्रिकी कर्मचारी 293, प्रशासकीय 426 असे मिळून 2 हजार 201 कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती विभागीय कार्यालयातून देण्यात आली. तर अद्यापही चालक 295, कंत्राटी चालक 58, वाहक 268, चालक कम वाहक 50, यांत्रिकी कर्मचारी 58, प्रशासकीय 8 असे मिळून 737 कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. मात्र दि. 22 एप्रिलपर्यंत सर्व कर्मचारी कामावर हजर होतील, असा विश्‍वास वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button