महाबळेश्वर : पसरणी घाटात अज्ञात व्यक्‍तीने लावली आग : पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात तर हजारो झाडे जळाली | पुढारी

महाबळेश्वर : पसरणी घाटात अज्ञात व्यक्‍तीने लावली आग : पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात तर हजारो झाडे जळाली

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : वाई -पंचगणीला जोडणाऱ्या पसरणी घाटामध्ये दांडेघर गावाच्या बस स्टॉपजवळ शनिवारी (दि. 16) दुपारी 2.30 वाजण्याच्या आग लागली. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्यामुळे निसर्गसंपदेची मोठी हानी झाली आहे. तसेच सर्वत्र धुराचे लोट पाहावयास मिळाले. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आठवडयात सलग आलेल्‍या सुट्ट्यांमुळे पाचगणी व महाबळेश्वरमध्‍ये पर्यटकांची गर्दी होती. आगीच्‍या घटनेमुळे काहीकाळ सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाई-पाचगणीला जोडणाऱ्या पसरणी घाटात अज्ञात व्यक्तींने वणवे लावले होते. या वणव्यात घाटातील वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या वणव्यामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वाईहून पाचगणी व महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाटातूनच जावे लागते. या मार्गावरून कोकणाकडे जात येत असल्याने घाटातून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. जैवविविधतेने नटलेल्या या घाटात अनेक दुर्मीळ वृक्ष व पशुपक्षीही आहे. मात्र, विघ्नसंतोषी व्यक्तींमुळे वृक्षसंपदा व पक्ष्यांच्या अधिवासावर कृत्रिम संकट निर्माण केले आहे. तर घाटात वणवे लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. शनिवारी घाटात लावण्यात आलेल्या वणव्यात गवत तसेच हजारो वृक्ष जळून खाक झाले आहेत. तसेच पक्ष्यांची घरटीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

एकीकडे शासन वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून उजाड वन जमिनीवर पुन्हा हिरवाई रुजवण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या जंगल संपदेचा काही विघ्नसंतोषी नाश करत आहेत. वनविभागाने वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच डोंगरात अत्यावश्यक ठिकाणी जाळ पट्टे तयार करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा  

Back to top button