सातारा : लॉडविक, एलिफंट हेड पॉईंट धोकादायकसंरक्षक कठडे, रेलिंग तुटल्याने धोका ; वनविभागाचे दुर्लक्ष | पुढारी

सातारा : लॉडविक, एलिफंट हेड पॉईंट धोकादायकसंरक्षक कठडे, रेलिंग तुटल्याने धोका ; वनविभागाचे दुर्लक्ष

महाबळेश्‍वर : पुढारी वृत्तसेवा
महाबळेश्‍वर पर्यटन स्थळावरील अद्वितीय निसर्गसौंदर्य लाभलेल्या लॉडविक व एलिफंट हेड पॉईंटची दुरवस्था झाली आहे. नादुरुस्त संरक्षक कठडे व तुटलेल्या रेलिंगमुळे धोका निर्माण झाला आहे. या पॉईंट परिसरात पर्यटकांसाठी साधी स्वच्छतागृहाची देखील सोय उपलब्ध नाही. वनविभागाच्यावतीने वनव्यवस्थापन समितीमार्फत पर्यटकांकडून कर वसुली केली जाते. मात्र, पर्यटकांना सुविधा मिळत नाहीत. धोकादायक पॉईंटवर साधा एक फलक लावण्याची तसदी देखील वनविभाग घेत नाही, यामुळे संताप व्यक्त होत आहे.

जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक या प्रेक्षणीय स्थळांवर निवांत वेळ घालवण्यासाठी येतात. महाबळेश्‍वर शहरापासून अंदाजे चार किमी अंतरावर अद्वितीय निसर्गसौंदर्य लाभलेला लॉडविक, एलिफंट हेड हे पॉईंट्स असून या पॉईंटवरून किल्ले प्रतापगड, मकरंदगड, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आंबेनळी घाटाची वळणे, सूर्यास्ताचे विहंगम दृश्य नजरेत साठवण्यासाठी लाखो पर्यटक येथे येतात. येथील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांपैकी हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. मात्र, काही वर्षांपासून या पॉईंटची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

एलिफंट हेड (हत्तीचा माथा) पॉईंटवरील संरक्षक कठडे नादुरुस्त अवस्थेत असून लोखंडी रेलिंग जागोजागी तुटलेली आहेत. मात्र, येथे धोक्याचा सूचना फलकही लावलेला नाही. संरक्षक कठडे तुटलेले असतानाही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन छायाचित्र काढतात. एखाद्या पर्यटकाच्या जीवावर बेतले तर त्याची जबाबदारी घेणार कोण? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

युद्ध पातळीवर दुरुस्ती आवश्यक

ऑर्थर सीट, केट्स पॉईंटवर सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, लॉडविक, एलिफंट हेड या धोकादायक पॉईंटकडे मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे. अनेकवेळा पर्यटकांत सुट्टीचा फिवर असल्याने दंगामस्ती सुरू असते. त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. वनखात्याने प्रथमत: अशा धोकादायक पॉईंटवर संरक्षक कठडे व रस्त्यांची कामे युद्धपातळीवर करण्याची मागणी पर्यटक व स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button