कोल्हापूर : पालकमंत्र्यांविरोधात ईडीकडे लवकरच तक्रार | पुढारी

कोल्हापूर : पालकमंत्र्यांविरोधात ईडीकडे लवकरच तक्रार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात लवकरच ईडीकडे तक्रार करणार असल्याचे माजी महापौर सुनील कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. कोणाच्या सांगण्यावरून नव्हे, तर त्यांची चोरी आमच्या ताब्यात आहे. आपण व सत्यजित कदम मिळून तक्रार करणार आहोत. त्याविरोधात त्यांनी कुठेही दावा करावा, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

घरफाळा वसुलीसाठी सामान्यांना 24 टक्के दंड-व्याजासह जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. मग, सुमारे तीस कोटींचा घरफाळा थकीत असणार्‍या पालकमंत्र्यांना नोटीस का देण्यात आलेली नाही? असा सवाल करून ते म्हणाले, त्यांच्या मिळकतींबाबत नोटीस काढून पाच महिने उलटले. त्यानंतर मॉल्सबाबतचे 29 करार दुय्यम निबंधक कार्यालयातून आणून महापालिकेला दिले. तेे दिल्यानंतर 21 दिवसांत वसुलीची नोटीस काढणे आवश्यक होते. मात्र, ती काढलेली नाही.

हे महापालिकेचे नुकसान असून हा फाळा भरला तर मनपा कर्मचार्‍यांचा पगार वेळेवर होईल. पालकमंत्र्यांनी महापालिकेला कोणती मदत केली ते जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. डी. वाय. पाटील बँकेच्या इमारतीत बेकायदेशीर बांधकाम झाले आहे. त्याचा 21 वर्षे फाळाच नाही, त्याबाबत अद्याप मापे घेतलेली नाहीत, असे हास्यास्पद उत्तर महापालिका प्रशासन देत आहे. नर्सिंग कॉलेजचा फाळा भरलेला नाही, असे सांगत ड्रीमवर्ल्ड प्रकरणी काहीही देणे लागत नाही म्हणणार्‍यांनी 52 लाखांचा फाळा भरला आहे. उर्वरित दोन वर्षांचा फाळा दंड-व्याजासह भरावा, त्याखेरीज त्यातील साहित्य संबंधितांना देऊ नये, अशीही मागणी कदम यांनी
केली.

घरफाळ्याला दंड, व्याज ही आमची चूकच होती

घरफाळ्यावर 18 टक्के दंड व्याज वसूल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेने केला होता. ती आमची नगरसेवक म्हणून चूकच होती असेही कदम यांनी सांगितले. स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात येण्यापासून पालकमंत्र्यांनी सव्वा वर्षे आपल्याला रोखले; पण आता आम्ही भाऊ त्यांना सळो की पळो करून सोडू, दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

Back to top button