चंद्रकांत पाटील एवढे अपरिपक्व असतील असे वाटले नव्हते : पालकमंत्री सतेज पाटील यांची टीका | पुढारी

चंद्रकांत पाटील एवढे अपरिपक्व असतील असे वाटले नव्हते : पालकमंत्री सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात नाव न घेता 30 कोटी रु. घरफाळा थकबाकीबाबत माझ्यावर टीका केली. त्यानंतर भाजपच्या ट्विटर व कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील उमेदवारांनी माझ्या नावाचा उल्लेख त्यात केला. पण त्यांना कळायला पाहिजे की थकबाकी असती तर विधान परिषद निवडणुकीतच माझा उमेदवारी अर्ज बाद झाला असता; मात्र त्यांना एवढेही कळत नाही. कोणतरी फिडींग करतेय म्हणून ते काहीही बोलतात. वास्तविक दोनवेळा आमदार आणि पालकमंत्रीसह विविध पाच खात्यांचे मंत्री राहिलेले चंद्रकांत पाटील एवढे अपरिपक्व असतील असे वाटले नव्हते, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, डी. वाय. पाटील ग्रुपने 2003 पासून आजअखेर साडेअकरा कोटींचा घरफाळा भरला आहे. महापालिकेनेही आजपर्यंत डी. वाय. पाटील ग्रुपची कोणतीही थकबाकी नाही, असे पत्रही दिलेले आहे. सध्या विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे. निवडणूक राहिली बाजूला आणि सातत्याने माझ्यावरच टीका असा त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत फोन करून पुरविलेली माहिती खरी की खोटी याची खातरजमा करू घ्यायला पाहिजे होती.

मोघम आरोप करून ते सोशल मीडियावर चालवतात. शंभरवेळा खोटे बोलून ते खरे असल्याचे भासवायचे ही भाजपची नीती आहे. गेल्या काही वर्षांत निवडणुकीवेळीच विरोधक माझ्यावर आरोप करतात. ज्या दिवशी निकाल लागतो आणि मी विजयी होतो त्यावेळी ते गप्प बसतात. विरोधकांनी असे बिनबुडाचे आरोप करू नयेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक भाजप आणि चंद्रकांत पाटील यांनी लादली आहे. वास्तविक जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायला हवा होता. मन मोठ्ठं दाखवायला पाहिजे होते. उत्तर प्रदेशसह इतर राज्यातील निकालानंतर भाजपमध्ये उन्माद वाढला आहे. परंतु कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. ताराराणीच्या या भूमीत जाधव यांना आम्ही पहिली महिला आमदार करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.

भाजप, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरसाठी काय केले सांगावे : पालकमंत्री पाटील

चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना त्यांना थेट पाईपलाईनसाठी अनेकवेळा भेटलो. योजना पूर्ण करून हवे तर तुम्ही श्रेय घ्या, असे सांगितले. परंतु त्या कालावधीत त्यांनी कधीही योजनेकडे लक्ष दिले नाही. भाजपच्या काळातच परवानग्या रखडल्या. त्यानंतर दोन वर्षे कोरोनामुळे संपूर्ण देश ठप्प होता. आता दर पंधरवड्यात योजनेच्या प्रगतीसाठी बैठक घेत आहे. टीका करण्यापेक्षा भाजपने व चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरसाठी काय केले हे सांगावे, असे आव्हानही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

Back to top button