सातारा : जिल्हा परिषदेचा आज अर्थसंकल्प प्रशासक पहिल्यांदाच सादर करणार बजेट | पुढारी

सातारा : जिल्हा परिषदेचा आज अर्थसंकल्प प्रशासक पहिल्यांदाच सादर करणार बजेट

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प शुक्रवार, दि. 25 मार्च रोजी पदाधिकारी व सदस्याविना प्रथमच प्रशासक सादर करणार आहेत. त्यामुळे प्रशासक कोणकोणत्या विभागाला झुकते माप देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल दि. 20 मार्च रोजी संपल्यामुळे जिल्हा परिषदेचा सोमवारी प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यापासून विविध विभागांचा आढावा घेवून त्यांनी कामकाज सुरु केले आहे.

शुक्रवार, दि. 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशासक विनय गौडा हे प्रथमच जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसेच पदाधिकारी व सदस्याविना पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडला जात आहे. या अर्थसंकल्पीय सभेस जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रशासक सादर करणार्‍या अर्थसंकल्पात कोणकोणत्या नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश केला आहे? शिक्षण विभाग, लघुपाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा यासह अन्य विभागाला प्रशासक अर्थसंकल्पात झुकते माप देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अर्थसंकल्पीय सभेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासक विनय गौडा यांनी गुरुवारी सकाळी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेवून विविध विषयांवर चर्चा केली. तसेच प्रलंबित कामाचा त्वरित निपटारा करण्याच्या सूचना सर्व अधिकार्‍यांना दिल्या. दरम्यान, पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल संपला असला तरी सदस्यांच्या झेडपीत फेर्‍या वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ज्या-ज्या विभागात प्रलंबित कामे आहेत त्या विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेवून प्रलंबित कामाचा निपटारा करताना सदस्य व पदाधिकारी दिसत आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button