सातारा : माणमधील वाळू तस्करीचा पेनड्राईव्ह विधिमंडळात, आ. जयकुमार गोरेंची लक्षवेधी | पुढारी

सातारा : माणमधील वाळू तस्करीचा पेनड्राईव्ह विधिमंडळात, आ. जयकुमार गोरेंची लक्षवेधी

खटाव : पुढारी वृत्तसेवा
माण तालुक्यातील अवैध वाळू तस्करी आणि वाळू तस्करांबरोबर अधिकार्‍यांचे असलेले आर्थिक व्यवहारांचे साटेलोटे थेट विधिमंडळाच्या सभागृहात पोहोचले. वरिष्ठ अधिकार्‍यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात? याविषयीची वाळू तस्कर आणि तलाठ्यांमधील ऑडिओ आणि व्हिडीओ क्लीप असणारा पेनड्राईव्हच आ. जयकुमार गोरेंनी सभागृहात सादर केला. दोषी अधिकारी आणि वाळू तस्करांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्‍नही त्यांनी लक्षवेधीद्वारे विचारला. त्यावर या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्‍वासन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिले.

माण तालुक्यात वाळूचा अवैध उपसा आणि वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. माणगंगा नदीचे पात्र वाळू तस्करांनी कुरतडून टाकले आहे. ‘पुढारी’ने याबाबत आवाज उठवला होता. तरीही थातूरमातूर कारवाया झाल्या. अधिकार्‍यांच्या कृपेने पुन्हा जोमात वाळूतस्करी सुरु झाली. माण तालुक्यात अशा घटना नेहमीच होतात. गेल्या महिन्यात तर वाळू तस्करांकडून वरिष्ठ अधिकार्‍यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात हे दाखवणारी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लीपच व्हायरल झाली होती. दै. ‘पुढारी’ने आवाज उठवल्यावर पाच तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तहसीलदारांची बदली केली होती. या प्रकरणातील बडे मासे मात्र मोकाट सुटले होते. आ. जयकुमार गोरे यांनी अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडताना त्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लीपचा पेनड्राईव्हच विधिमंडळात सादर केला.

आ. गोरे म्हणाले, माण तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. वाकी येथे पाच तलाठ्यांच्या पथकाने जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर अशी वाळू उपसा करणारी वाहने आणि वाळूचा अवैध साठा पकडला होता. त्या ठिकाणी सगळे वाळू तस्कर आले आणि तलाठ्यांच्या कारवाईला विरोध केला. आम्ही पोलिस स्टेशन, तहसीलदार, कलेक्टरला हप्ता देतो त्यामुळे आमच्यावर कारवाई करता येणार नाही. आम्ही वीस लाखांचे हप्ते देतो, तुम्ही आमची वाहने पकडताच कशी असा दम देवून तस्कर तलाठ्यांसमोरुन वाहने घेऊन गेले. या संभाषणाच्या क्लीप सर्वत्र व्हायरल झाल्या. मी स्वतः तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकार्‍यांबरोबर बोललो. कोणतीच कारवाई होत नव्हती. या विषयीच्या बातम्या आल्यावर फक्‍त तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली.

आम्ही तहसीलदारांना हप्ते देतो, त्यांना फोन लावा, नाहीतर आमचे हप्ते परत द्या असा दम देणारे तस्कर अद्याप मोकाट आहेत. काही दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या चालकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती. त्यामुळे या प्रकरणात कारवाई झालेल्या तलाठ्यांचा दोष किती? तहसीलदार आणि तस्करांवर कारवाई का नाही? या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी होणार का? असे प्रश्‍न आ. गोरेंनी विचारले. लक्षवेधीवर उत्तर देताना महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात म्हणाले, पेनड्राईव्ह संभाषणात तस्कर बोलत आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करुन कारवाई करु. चौकशीसाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक केली जाईल. तहसीलदारांच्या विरोधात पुरावे असतील तर त्यांच्यावर तसेच वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

माणच्या तहसीलदारांना निलंबित केले जाईल…

पुरावे असल्यास तहसीलदारांवर कारवाई करू या महसूलमंत्र्यांच्या उत्तरावर आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल व सहकार्‍यांनी आक्षेप घेतला. ज्या तहसीलदारांवर लाचलुचपत विभागाची कारवाई सुरु आहे त्या तहसीलदारांचे नियमाप्रमाणे निलंबन झालेच पाहिजे, अशी मागणी सभागृहात लावून धरली. त्यानंतर ना. बाळासाहेब थोरात यांनी माण तहसीलदारांवर लाचलुचपत विभागाची कारवाई सुरु असल्याने त्यांना निलंबित केले जाईल, असे सांगितले.

Back to top button