सातारा : रामराजे, तुम्हाला लोकसभेत पहायचयं : उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा : हरीष पाटणे
राज्याच्या विधानपरिषदेचे सभापती व सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते ना. रामराजे नाईक निंबाळकर यांची विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत जुलैमध्ये संपणार आहे. यानिमित्त विधान परिषदेच्या सभागृहात निरोप समारंभावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी ‘रामराजे, तुम्हाला एकदा लोकसभेमध्ये गेलेलं पहायचयं’ अशा शब्दात अनोख्या शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेच्या सभागृहानेही सभापतीपदावर पुन्हा रामराजेच हवेत अशी भूमिका मांडल्याने 2024 पर्यंत रामराजेंनाच विधान परिषदेवर घेवून पुन्हा सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
15 वर्षांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचनेमुळे सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे ना. निंबाळकर यांचा हक्काचा फलटण विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व राष्ट्रवादीचे नेते ना. अजितदादा पवार यांनी त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. एवढेच काय राज्याचे सर्वोच्च सभागृह असलेल्या विधानपरिषदेत सभापती पदावर रामराजेंना विराजमान केले गेले. गेले 6 वर्षे रामराजे ना. निंबाळकर हे विधान परिषद सभापतीपदावर उत्कृष्ट काम करत आहेत. विधान परिषदेला रामराजेंच्या सभापतीपदामुळे विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या खुर्चीचीही उंची वाढली आहे.
रामराजेंसह 10 जणांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत जुलैमध्ये संपणार आहे. यानिमित्त विधान परिषदेत बुधवारी रामराजे ना. निंबाळकर यांच्यासह 10 सदस्यांच्या निरोप समारंभाचा औपचारिक कार्यक्रम घेण्यात आला. तेव्हा सभागृहातील सदस्यांनी रामराजेंच्या विधीमंडळ कौशल्याचे व सभागृहाचे कामकाज चालवण्याच्या पध्दतीचे कौतुक केले. सद्य राजकीय परिस्थितीत रामराजेच पुन्हा सभापतीपदावर पाहिजेत असा सदस्यांचा सूर राहिला. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनीही ना. रामराजे ना. निंबाळकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे त्यांना पुन्हा संधी देतील. मात्र, रामराजे तुम्हाला एकदा लोकसभेमध्ये गेलेलं पहायचयं असे अजितदादा आवर्जून म्हणाले.
सभागृहात निरोपाला उत्तर देताना ना. रामराजे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आपणाला पुन्हा संधी देतील याची मला खात्री आहे. अजितदादांनी शुभेच्छांमध्ये जे सांगितल तेही खूप महत्वाचे आहे. सद्य स्थितीत सभागृहाला मी सांगू इच्छितो फलटणचा राजवाडा तुम्हा सगळ्यांसाठी कायमचा खुला आहे. अजितदादांच्या सूचक विधानामुळे 2024 पर्यंत रामराजे ना. निंबाळकर यांना पुन्हा विधानपरिषदेवर संधी देवून सभापतीपदावर कायम ठेवण्यात येईल व त्यांना लोकसभा लढवण्यास सांगितले जाईल, असेच चित्र दिसत आहे.
हेही वाचलत का ?
- रॉकेट जाऊ शकत नाही, तेथे ‘नासा’चे मिशन
- अमेरिकेतील गाव वसलेय पाताळात
- शरीरावर कोरून घेतले तब्बल 40 लाखांचे टॅटू