सातार्‍यात तब्बल ५९ वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा थरार | पुढारी

सातार्‍यात तब्बल ५९ वर्षानंतर महाराष्ट्र केसरीचा थरार

सातारा : विशाल गुजर
सातारा जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा वारसा लाभलेल्या जिल्ह्यात यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यात दि. 4 ते 9 एप्रिलला 64 व्या महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगणार आहे. जिल्ह्यातील कुस्ती शौकिनांच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. तब्बल 59 वर्षानंतर महाराष्ट्र केेसरीचा थरार सातारकरांना पहावयास मिळणार आहे.

1961 मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा शुभारंभ झाला. पहिली स्पर्धा औरंगाबादला झाली. यामध्ये कोल्हापूरमधील दिनकर दह्यारी हे महाराष्ट्र केसरी झाले. 1962 मध्ये धुळ्याच्या स्पर्धेत सांगलीचे भगवान मोरे यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. 1963 मध्ये सातार्‍यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत 365 मल्‍लांनी सहभाग घेतला होता. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले होते. मानाच्या कुस्तीसाठी एकही स्पर्धक नसल्याने कोणालाही मानाची गदा देण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरीची लढत झालीच नाही. महाराष्ट्र केसरीसाठी स्पर्धक न आल्याने रद्द झालेली ही राज्यातील एकमेव स्पर्धा राहिली आहे.

जिल्ह्यात सुमारे 59 वर्षानंतर ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा होत असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने क्रीडा विभागाकडून नियोजन सुरु आहे. सुमारे 50 हजार कुस्तीशौकीन कुस्ती पाहतील, असा आखाडा सातार्‍यात तयार करण्यात येणार आहे.

-युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी

हेही वाचलत का ?

Back to top button