सातारा : संशयिताची पोलिसांच्या हातावर तुरी; बँकेची 1.75 कोटीची फसवणूक | पुढारी

सातारा : संशयिताची पोलिसांच्या हातावर तुरी; बँकेची 1.75 कोटीची फसवणूक

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यातील एका बँकेला 1 कोटी 75 लाखाला फसविल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या मंगळवार चौकीत आलेला संशयित आरोपी रोहन वाघमारे याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच संशयिताला अडविण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने कारने उडविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, रात्री याबाबत तक्रार दाखल झाली नव्हती.

रोहन बाळासाहेब वाघमारे (रा. अझादनगर, मोळाचा ओढा) असे संशयिताचे नाव असून, याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी विवेक कुमार सिन्ह (रा. भंडारी एजन्सी, देगाव फाटा) यांनी बँकेच्या फसवणुकीबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रोहन वाघमारे याचा बांधकाम व्यवसाय असून, त्याने मंगळवार पेठ परिसरात रोहन हाईट्स नावाचे अर्पाटमेंट बांधण्यासाठी एसबीआयच्या प्रतापगंज पेठ शाखेतून 2015 साली 1 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज प्रकरण घेताना संशयिताने रोहन हाईट्स अर्पाटमेंटमध्ये 4 फ्लॅट व 2 दुकान गाळे बांधणार असल्याचे सांगून तशी कागदपत्रे बँकेला दिली होती.

त्यानंतर वाघमारे याने 2018 सालापर्यंत कर्जाच्या रकमेपोटी येणारे हप्ते भरले होते. मात्र, 2019 सालापासून त्याने बँकेला हप्ते देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर बँकेने त्याला वेळोवेळी थकीत कर्जाच्या रकमेबाबत मागणी केली असता, त्याने ती भरण्यास टाळाटाळ केली. यामुळे बँकेच्या अधिकार्‍यांनी पुढील कार्यवाहीसाठी रोहन अर्पाटमेंट या वास्तूची पाहणी केली असता, वाघमारे याने तेथे काढलेले फ्लॅट व दुकान गाळ्यांऐवजी काढलेले फ्लॅट बँकेच्या परस्पर विकल्याचे निदर्शनास आले. बँकेची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने बँक कर्मचार्‍यांनी दि.9 रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रार दाखल झाल्यानंतर याचा तपास मंगळवार चौकीकडे होता. गुरुवारी दुपारी संशयित रोहन वाघमारे हा मंगळवार चौकीत आला. त्याच्याकडे चौकशी सुरु असतानाच तो तहान लागल्याने तेथून उठला व थेट बाहेर येवून त्याने त्याची कार सुरु केली. ही बाब चौकीतील काही पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयिताने कारचा वेग धरल्याने पोलिस हताशपणे पाहत बसले. संशयिताने पोलिसांना झासा दिला मात्र कोणी पोलिस यामध्ये जखमी झाले नाही.

चौकीत नेमकं काय घडलं?

एसबीआयसारख्या बँकेची फसवणूक झाल्याने पोलिसांचा तपास सुरू झाला. मात्र फसवणूक, संशयिताचे पळून जाणे यामुळे या प्रकरणात अनेक ट्विस्ट निर्माण होत प्रश्न उपस्थित झाले आहेत. संशयित रोहन हा स्वत: हजर झाला होता की, पोलिसांनी त्याला आणला होता? स्वत: हजर झाला असेल तर जबाब सुरू असताना त्याने अचानक पळून जाण्याचा निर्णय का घेतला? चौकीत पोलिस व संशयितामध्ये नेमका जबाब तसेच कोणती चर्चा झाली? संशयित सध्या कुठे गेला आहे? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

Back to top button