सातारा : पाटणमध्ये आणखी पाच मृतदेह सापडले, अजून ५ बेपत्ता

सातारा : पाटणमध्ये आणखी पाच मृतदेह सापडले, अजून ५ बेपत्ता
Published on
Updated on

पाटण मध्ये आणखी पाच मृतदेह सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन गाडले गेलेल्या आंबेघर, मिरगाव, ढोकावळे येथील आणखी पाचजणांचे मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे.

मागील दोन दिवसांत या गावातील 26 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफ जवानांसह स्थानिकांना यश आले आहे. अजूनही आंबेगाव आणि मिरगाव येथील 5 बेपत्ता लोकांचे शोधकार्य सुरूच आहे.

तालुक्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळीसह तालुक्यातील 11 गावात भूस्खलन झाले आहे. यापैकी आंबेघर, ढोकावळेसह मिरगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जिवित हानी झाली आहे. शनिवारी आंबेघरमधील 16 बेपत्ता लोकापैकी 11 जणांचे मृतदेह सापडले होते.

रविवारी सकाळी साडेआठ वाजता एनडीआरएफ पथकासह मदतीसाठी आलेल्या परिसरातील युवकांनी शोध मोहीम सुरू केली होती. पाच वाजेपर्यंत आणखी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले होते. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही एका लहान बाळासह तिघांचा शोध सुरू आहे. अधूनमधून पडणारा पाऊस व कमालीचा चिखल यामुळे बचाव कार्यात अडचणी निर्माण होत आहेत.

कोयना विभागातील मिरगाव येथे येथील मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या बारापैकी सहा व्यक्तींचे मृतदेह शनिवारी संध्याकाळपर्यंत बाहेर काढून ते ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. शनिवारी रात्री बंद झालेले बचावकार्य रविवारी पुन्हा सकाळी सुरू करण्यात आले होते. सायंकाळपर्यंत आणखी दोघांचे मृतदेह सापडले होते.

उर्वरित अन्य चार व्यक्तींचा शोध अद्यापही सुरूच आहे. या ठिकाणी तीन जेसीबी, पोकलेनच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. पाऊस व मोठ्या प्रमाणावर चिखल व गाळ यामुळे बचाव कार्यात अडचणी येत असल्याची माहिती कोयनानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी दिली.

ढोकावळे येथील चार व्यक्ती मातीच्या ढिगार्‍याखाली गाडल्या गेल्या होत्या. त्या सर्वांना बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आपत्तीग्रस्त भागातील शेकडो लोकांना कोयनानगर तसेच संगमनगर (धक्का) येथील मिरगाव हायस्कूलमध्ये सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी तळ ठोकला असून लोकांना मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

कोयनेचे दरवाजे साडेपाच फुटांवर…

कोयना धरणात रविवारी सायंकाळी प्रतिसेकंद 51 हजार 307 क्युसेक्स पाण्याची आवक होत होती. धरणाचे दरवाजे साडेपाच फुटांवर स्थिर ठेवण्यात येऊन प्रतिसेकंद 31 हजार 598 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीत सुरू होता. धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी झाल्याने आता कोयना तसेच कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत घट होत आहे. धरणातील पाणीसाठा 88.96 टीएमसीपर्यंत पोहोचला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news