सातारा : जरंडेश्‍वर रेल्वे भुयारी मार्ग जीवघेणा ; समांतर भुयारी मार्गाची मागणी | पुढारी

सातारा : जरंडेश्‍वर रेल्वे भुयारी मार्ग जीवघेणा ; समांतर भुयारी मार्गाची मागणी

शिवथर : पुढारी वृत्तसेवा
वडूथ, ता. सातारा येथील जरंडेश्‍वर रेल्वेस्टेशननजीक रेल्वे रस्ता दुहेरीकरणाचे काम सुरू असून या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग रस्ता बंद करून भुयारी रस्त्याचे काम चालू आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाने भुयारी रस्त्याचे चुकीचे काम करून वडूथ- सातारारोड रस्त्याला समांतर भुयारी मार्ग न करता धोकादायक वळण देऊन मूळ रस्त्याला जोडले असल्याने भुयारी मार्गातून होणारा प्रवास जीवघेणा ठरण्याचा धोका आहे.

वडूथ-आसगावचे सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित रेल्वे प्रशासनाला हा धोका सांगितला असता त्यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली. रेल्वे प्रशासनाने त्यांना हवा तसाच भुयारी मार्ग केला आहे. त्यामुळे वडूथ व आसगाव ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने हे धोकादायक वळण काढून मुळ रस्त्याला भुयारी मार्ग समांतर करावा. अन्यथा, जन आंदोलन करू, असा इशारा आसगाव व वडूथ ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी वडूथ सरपंच किशोर शिंदे, आसगाव सरपंच आनंद शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी केली आहे.

अवजड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे हित लक्षात घेऊन धोकादायक वळण काढून मूळ रस्त्याला समांतर रस्ता तयार करावा. या भुयारी मार्गातून अनेक साखर कारखान्यांची मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरू असते तसेच विविध कंपन्यांच्या अवजड वाहनांची वाहतूकही सुरू असते. याच रस्त्यावरून सातारारोडकडे दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे या भुयारी मार्गात अपघातांची शक्यता वाढली आहे.

हेही वाचलत का ? 

Back to top button